व्हायब्रंट गोवाचा ‘प्रेरणादायी बिझनेस हाऊस’ पुरस्कार फोमेंतो रिसोर्सेसला ..!

पर्यटन ब्रँडचा पुरस्कार टाटा ग्रुप इंडियन हॉटेल्सला प्राप्त | फोमेंतो रिसोर्सेस ठरले ‘प्रेरणादायी बिझनेस हाऊस’ | ‘व्हायब्रंट गोवा’चा मानाचा पुरस्कार : पर्ल कोलवाळकर प्रेरणादायी खेळाडू
Edited by:
Published on: July 10, 2023 10:58 AM
views 100  views

पणजी : व्हायब्रंट गोवातर्फे दिला जाणारा प्रेरणादायी बिझनेस हाऊस पुरस्कार यंदा फोमेंतो रिसोर्सेसला प्राप्त झाला. फोमेंतो रिसोर्सेसचे  संचालक ज्यो लुईस यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि व्हायब्रंट गोवाचे अध्यक्ष राजकुमार कामत यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

राजभवनच्या दरबार हॉलमध्ये रविवारी सायंकाळी व्हायब्रंट गोवाच्या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार आलेक्स रेजिनाल्ड तसेच व्हायब्रंट गोवाच्या सर्व ट्रस्टींची यावेळी उपस्थिती होती.

प्रेरणादायी बिझनेस हाऊस पुरस्कार यंदा फोमेंतो रिसोर्सेसला, तर पर्यटन ब्रँडचा पुरस्कार टाटा ग्रुप इंडियन हॉटेल्सला प्राप्त झाला. ग्लोबल एक्स्पोर्टर पुरस्कार डेक्कन फाईन केमिकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एमएसएमई एक्स्पोर्टर पुरस्कार अॅस्ट्रा काँक्रिट प्रोडक्ट्स कंपनी, प्रेरणादायी खेळाडूचा पुरस्कार पर्ल कोलवाळकर, प्रेरणादायी कलाकार पुरस्कार प्रसिद्ध गायिका सोनिया सिरसाट, प्रेरणादायी बिगरगोमंतकीय उद्योजक पुरस्कार विजय थॉमस, म​हिला उद्योजिका पुरस्कार फिलू मार्टिन्स, तर प्रेरणादायी पुरुष उद्योजकाचा पुरस्कार साहील अडवलपालकर यांना  मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

दरम्यान, राज्यातील उद्योगांच्या विकासासाठी राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करीत आहे. व्हायब्रंट गोवाने राज्यात आयोजित केलेल्या परिषदेचा राज्यातील युवा उद्योजकांना मोठा फायदा मिळाला. नवउद्योजक तयार करण्यात व्हायब्रंट गोवाचे मोठे योगदान आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले. व्हायब्रंट गोवाच्या परिषदेनंतर लगेचच कोविडचा प्रसार सुरू झाला. त्यामुळे या परिषदेचे सकारात्मक परिणाम त्या काळात दिसून आले नाहीत. आज दोन वर्षांनंतर त्या परिषदेचे परिणाम दिसून येत आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.