वेताळ बांबर्डे कदमवाडी येथे उबाठा शिवसेनेला खिंडार

गावाचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणार : आमदार निलेश राणे
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 15, 2025 22:11 PM
views 158  views

कुडाळ : गेल्या दहा वर्षात काय झाले हे पाहण्यापेक्षा यापुढे आपल्या गावाचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे असे आमदार निलेश राणे यांनी सांगून वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील आवश्यक असणारा पूल लवकरच केला जाईल असे सांगितले वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील सुमारे २०० लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यामुळे उबाठा शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे त्यांचा हा बालेकिल्ला ढासळला आहे.

वेताळ बांबर्डे येथील कदमवाडी मध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांनी उबाठा शिवसेनेमधून शिवसेनेमध्ये आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, रचना नेरुरकर, रेवती राणे, माजी सभापती नूतन आईर, श्रुती वर्दम आदी उपस्थित होते. यावेळी उबाठा शिवसेनेचे युवा अध्यक्ष भिवा कदम, माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप सावंत, माजी उपसरपंच संतोष कदम, माजी उपसरपंच दिनेश कदम, माजी ग्रामपंचायत सदस्य बाबुराव बाबंर्डेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य देवकी कदम यांच्यासह २०० ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख नागेश आईर यांनी केले. 

या प्रवेशावेळी ग्रामस्थांनी आपल्या मागण्या सांगितल्या तसेच आमदार निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीला प्रभावित होऊन हा प्रवेश केला जातो आहे कारण यापूर्वी ज्या पक्षांमध्ये आम्ही होतो त्या पक्षात प्रामाणिकपणे काम केले पण आम्हाला न्याय मिळाला नाही हा न्याय आमदार निलेश राणेंकडून मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की गेल्या दहा वर्षांमध्ये या गावांमध्ये कोणता विकास झाला कोणता झाला नाही याबाबत टीका करणार नाही त्यावेळी कोणते प्रतिनिधी होते आणि तुम्ही प्रामाणिकपणे त्यांचे काम करत होता हे सुद्धा मी लक्षात घेणार आहे मी फक्त विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारा आमदार आहे त्यामुळे तुमच्या गावाच्या विकास कामांमध्ये मी नेहमीच अग्रेसर राहणार आहे तुमच्या मागण्या पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे तुम्ही ज्या मागणी आता केल्या आहेत त्या मागण्या लवकरच पूर्ण केल्या जातील असे त्यांनी सांगून आपण कुटुंब म्हणून एकत्र काम करू विकास करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत तुमचा दहा वर्षाचा विकासाचा जो आलेख होता तो लगेच पूर्ण होईल असे नाही पण जी महत्त्वाची कामे आहेत ती लवकर करण्यासाठी आम्ही तत्पर राहू असे त्यांनी ग्रामस्थांना आश्वासित केले.