तुळस गावात आढळला पुन्हा एकदा अति दुर्मिळ विषारी 'कॅस्ट्रोज कोरल साप' | सर्पमित्र महेश राऊळ यांचे यशस्वी बचावकार्य

Edited by: दिपेश परब
Published on: August 16, 2023 12:54 PM
views 2297  views

वेंगुर्ला : तुळस गावातील चूडजीवाडा येथील सद्गुरु सावंत यांनी तुळस येथीलच सर्पमित्र महेश राऊळ यांना फोन करून आपल्या घरा समोर एक छोटासा साप आलाय असे कळविले. महेश राऊळ ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी त्या सापाला बघितल आणि त्यांच्या लक्षात आलं की हा अति दुर्मिळ असा कॅस्ट्रोज कोरल साप आहे, त्यांनी लगेचच त्याला सुरक्षितरित्या रेस्क्यू केले. २०२१ मध्ये सर्पमित्र महेश राऊळ यांना असा अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल साप आढळला होता. दोन वर्षांनी पुन्हा एकदा हा अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल साप आढळून आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधता खूपच वेगळी आहे त्यामुळे इथे अजूनही अनेक प्रकारचे दुर्मिळ साप, पक्षी, प्राणी असतील जे अजूनही कोणाच्या दृष्टीस पडले नाहीत. महेश राऊळ हे गेले अनेक वर्ष भर वस्तीत आलेले साप सुरक्षितरित्या रेस्क्यू करून ते नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम करतात. ते परिसरात सर्पमित्र म्हणून सुपरिचित आहेत. शिवाय भटके प्राणी असतील किंवा वन्यप्राणी जखमी प्राणी यांच्यावर ते उपचार करण्यासाठी सुद्धा महेश राऊळ नेहमी अग्रस्थानी असतात. रक्तदान क्षेत्रातही ते नेहमी अग्रस्थानी असतात. हा साप जीवंत पकडण्याचा मान पहिल्यांदा त्यांनाच मिळाला होता आणि दुसऱ्यांदाही हा मान त्यांनाच मिळाला आहे. सिंधुदुर्ग मध्ये हा त्यांना दुसऱ्यांदा साप मिळाला आहे. हा साप संपूर्ण पश्चिम घाटामध्ये प्रदेशनिष्ठ असून अतिशय दुर्मिळ असा आहे. हा साप पाहण्यासाठी सर्पमित्र भटकत असतात, हा साप दिसावा म्हणून संशोधनही केले जाते.

    छायाचित्रकारांना सुद्धा या सापाचे फोटो काढणे म्हणजे एक पर्वणीच असते. सिंधुदुर्ग मध्ये या सापाची नोंद ही तिसऱ्या वेळा झाली आहे. त्यामध्ये वन्यप्राणी अभ्यासक हेमंत ओगले यांना हा साप मृत अवस्थेत आढळला होता. आणि त्यानंतर सात ते आठ वर्षांनी दोन वेळा जीवंत साप महेश राऊळ यांनाच मिळाला आहे. या सापाचे संशोधन हेमंत ओगले यांनी केले आहे.हा साप विषारी प्रजातीमध्ये मोडला जाणारा आणि फारसा दृष्टीस पडत नाही. याचा रंग ब्राऊन ब्लॅक असून पोटाखालून पूर्णपणे भगवा असतो. आणि त्याचा भगवा रंग हा तो जहाल विषारी असल्याचे धोतक मानले जाते. दगडाखाली आणि पाला पाचोळ्याखाली हा साप नेहमी राहतो. त्याचे भक्ष छोटे बेडूक सरडे पाली गांडूळ इत्यादी आहे.


साधारणपणे दोन ते अडीच फुटापर्यंत या सापाची लांबी असते. पूर्ण वाढलेला साप हा करंगळी एवढा जाड असतो त्याच्याबरोबर त्याच्या डोक्यावर भगवी जाड रेषा असते आणि हा साप घाबरला तर आपली शेपटी गोल करून ती जमिनीवर आपटून आपल्याजवळ येऊ नका असा इशारा देत असतो. हा दुर्मिळ साप पुन्हा एकदा मिळाल्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जैवविविधता जगाच्या नकाशावर झळकली आहे. याआधी बरेचसे पशुपक्षी प्राणी जे अति दुर्मिळ आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आढळलेले आहेत. हल्लीच तुळस गावाच्या बाजूला होडावडे गावात रात्री चमकणारी आळंबी आढळून आली होती. याआधी काळा वाघ असेल, रांगणागडावर आढळलेला शेवाळी साप किंवा इतर दुर्मिळ पक्षी सिंधुदुर्गातच आढळल्याची नोंद आहे.

दरम्यान तुळस येथे या रेस्क्यूच्या वेळी त्यांच्यासोबत वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव सचिन परुळकर, गुरुदास तिरोडकर, सद्गुरु सावंत आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर सर्पमित्र महेश राऊळ यांनी त्या सापाला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.