
वेंगुर्ले- ‘उत्कृष्ट महाविद्यालय‘ पुरस्कार निवड प्रक्रियेअंतर्गत मुंबई विद्यापिठाच्या पडताळणी समितीने ११ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयाला भेट देत शैक्षणिक, प्रशासकीय, संशोधन, क्रीडा, सांस्कृतिक, विद्यार्थी कल्याण, सामाजिक बांधिलकी व पायाभूत सुविधा आदींची पाहणी करून आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली.
या पडताळणी समितीमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापिठ (पुणे)च्या माजी उपककुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्राचार्य डॉ.संजय चकाणे आणि बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणेचे प्राचार्य चंद्रकांत एन. रावल यांचा समावेश होता. या समितीचे आगमन झाल्यानंतरएनसीसी कॅडेट्सनी संचलन करून मानवंदना दिली. प्राचार्य डॉ. डी.बी.गोस्वामी, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तर शिक्षण प्रसारक मंडळाचे पेट्रन कौन्सिल सदस्य दौलतराव देसाई यांनी मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. ऐश्वर्या चव्हाण व सहका-यांनी ‘माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं‘ हे गीत सादर करून स्वागत केले.
प्राचार्य डॉ.गोस्वामी यांनी महाविद्यालयाचा प्रवास, एनएएसी ‘ए‘ ग्रेड (सीजीपीए ३.२३), शैक्षणिक-सामाजिक उपक्रम, हरित कॅम्पस, विद्यार्थी प्रगतीची आकडेवारी आणि विशेष कामगिरीचा आढावा सादर केला. तसेच विभागप्रमुखांनी आपल्या विभागांच्या शैक्षणिक व संशोधन कार्याची माहिती दिली.
समितीने प्रयोगशाळा, संगणक केंद्र, वाचनालय, क्रीडांगण, सांस्कृतिक सभागृह, एनसीसी-एनएसएस विभाग, मुलींसाठी वसतिगृह तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली. महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध संधी, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, संशोधनातील प्रगती व समाजाभिमुख उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष शिवानी देसाई, चेअरमन मंजिरी मोरे, सचिव जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल सदस्य दौलतराव देसाई तसेच प्राचार्य डॉ.डी.बी.गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले. समितीचा अहवाल लवकरच मुंबई विद्यापीठाकडे सादर होणार असून, त्यानंतर ‘उत्कृष्ट महाविद्यालय‘ हा मानाचा दर्जा मिळण्याची अंतिम प्रक्रिया पार पडणार आहे.