आरवलीमार्गे वेंगुर्ले - शिरोडा वाहतूक सुरु

Edited by: दिपेश परब
Published on: June 19, 2025 19:37 PM
views 482  views

वेंगुर्ले :  तालुक्यातील आरवली वेतोबा देवस्थान समोरील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने व अवकाळी पावसात पर्यायी मार्गावर पाणी आल्याने वेंगुर्ले आरवली मार्गे शिरोडा प्रवास सर्वच वाहनांसाठी बंद ठेऊन पर्यायी मार्ग सुरू होता. अखेर पुलाचे काम पुर्णत्वास आल्याने सोमवार दि. १६ पासून सर्व वाहनांसाठी मुख्य आरवली मार्गे शिरोडा हा मार्ग खुला करण्यात आला आहे. तब्बल दोन महिन्यांनी हे काम पुर्ण झाले आहे. 

दरम्यान, तीन आठवडे या मार्गावरून सर्वच प्रकारच्या वाहानांची वहातुक बंद केल्याने आरवलीच्या वेतोबाचे दर्शनास येणाऱ्या भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागला. तसेच एस.टी. बस गाड्या या अन्य पर्यायी मार्गाने ये-जा करण्याचा रूट केल्याने प्रवाशी वर्गास मात्र भुर्दंड बसला. त्यामुळे नागरीकांतून होत असलेली नाराजी अखेर पुलावरून वहातुक सुरू झाल्याने दूर झाली.

वेंगुर्ले आरवली मार्गे जाणाऱ्या गाड्या आरवली वेतोबा मंदिर समोरील पुलाचे बांधकाम दि. १५ एप्रिलपासून चालू करण्यात आले होते. या मुलाचे बांधकामावेळी या ठिकाणी पर्यायी मार्ग वाहातुकीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करण्यात आला होता. पण २० मे पासून जोरदार मान्सुनपुर्व पाऊस आला. त्यामुळे पर्यायी मार्गच वाहून गेला. त्यामुळे दि. २२ मे पासून सर्व प्रकारची ये-जा करणारी वाहातुक हि वेगळ्या मागनि व्हावी. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने टांक-आसोली-सोन्सुरे मार्गे शिरोडा अशी जाण्यासाठी तर शिरोडाहून येण्यासाठी शिरोडा-वेळागर-सागरतीर्थ मार्गे टांक हायस्कुल ते वेंगुर्ला अशी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत वेंगुर्ले तहसिलदार यांचेकडे लेखी पत्रव्यवहारातून करण्यात आली. त्यानुसार वेंगुर्ले तहसिलदार यांनी, सर्व प्रकारच्या बाहन धारकांनाकळण्यासाठी नोटीस बोर्डवर तशा सुचना तर प्रवासी एस.टी. बस गाड्यांसाठी आगार व्यवस्थापकांना पत्रे देण्यात आली होती. मान्सुनपुर्व पावसांत जोडून मान्सुन पाऊस सुरू झाला. त्यामुळे पुलाच्या ठिकाणी पर्यायी मार्गात पाणी आल्यामुळे, टांक मार्गे आसोली शिरोडा, अणसुर टांक-आसोली मार्गे शिरोडा व येणाऱ्या गाड्या शिरोडा-वेळागर-सागरतीर्थ मार्गे वेंगुर्ले अशी प्रवासी सेवा एस.टी. प्रशासनाकडून देण्यात येत होती. सदर पुलाचे काम जलद व्हावे व पुल लवकरात लवकर प्रवासासाठी खुला करावा यासाठी आरवलीचे माजी सरपंच मयूर आरोलकर व पोलीस पाटील मधुसुदन मेस्त्री यांनी सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा चालू ठेवला होता.

अखेर या पुलाचे बांधकाम १५ जून रोजी पुर्ण झाल्याने तो सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहातुकीस योग्य असल्याचे लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग वेंगुर्लेचे सहाय्यक उपअभियंता अश्लेष शिंदे यांनी लेखी पत्र वेंगुर्ले तहसिलदार यांना तसेच पोलीस निरीक्षक आणि वेंगुर्ले आगार व्यवस्थापक यांना देत या पुलावरून वहातुक सुरू करण्याचे स्पष्ट केले. 

त्यानुसार सदर वेतोबा मंदिरा समोरील पुल वहातुकीस खुला करताना त्या नवीन पुलावर पुरोहित बाळा आपटे यांचेमार्फत पुजन स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी उपस्थितांत संजय आरोलकर, आरवलीचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते मयूर आरोलकर, पोलीस पाटील मधुसुदन मेस्त्री,  श्रीपाद गुरव, सतीश येसजी, दिलीप पणशीकर, एकनाथ जोशी, कुणाल दळवी, सचिन येसजी, कृष्णा सावंत, बाळा आपटे, रंगनाथ सोन्सुरकर, सुशील भेरे, नंदा पेडणेकर, ठेकेदार विनय राणे, मयुरा राणे, प्रविण आरोलकर, कृष्णा येसजी, विष्णू सावंत, स्वप्नील येसजी, अक्षय येसजी, गौरव येसजी, सुहास गुरव आदींचा समावेश होता.