
वेंगुर्ले : मत्स्य व्यवसाय विभागा अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या "प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना" २०२१-२०२६ अंतर्गत कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरमित्र यांनी शनिवारी (२१ मार्च) राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी सागरमित्रांनी "बहूउद्देशीय समर्थन सेवे "अंतर्गत असलेल्या सागरमित्रांची नियुक्ती ३१ मार्च २०२६ रोजी संपुष्टात येत असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांना आपण ५ वर्षात केलेल्या कामाचा अहवाल सादर केला. तसेच सागरमित्रांची सेवा संपुष्टात येऊ न देता सिंधुरत्न योजने अंतर्गत पुन्हा नेमणूक करण्याची निवेदनाद्वारे विनंती केली.
यावेळी भाजप युवा मोर्चा सरचिटणीस राहुल गावडे ,ग्रा.प सदस्य प्रथमेश बांदेकर ,सुधीर नार्वेकर यांच्यासहित देवगड, मालवण, वेंगुर्ला सागरमित्र उपस्थित होते. या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत पालकमंत्र्यांनी यावर योग्य तो निर्णय आपण घेऊ असे सागरमित्र सिंधुदुर्ग यांना आश्वासन दिले. यावेळी सागरमित्रांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील प्रधानमंत्री यांच्या फ्लॅगशिप योजनेंतर्गत "प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना (PMMSY) २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो तरुण-तरुणींना "सागर मित्र" म्हणून रोजगार मिळाला. या योजनेच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायाशी संबंधित जागरूकता, समुद्र सुरक्षा, मच्छीमार कल्याण, पर्यावरण संरक्षण, तसेच मत्स्य उत्पादन वाढविण्याचे काम सागर मित्र करत होते. परंतु मार्च २०२६ मध्ये ही योजना संपुष्टात येत असल्याने सर्व सागर मित्र बेरोजगार होणार आहेत.
यामुळे आपण महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री या नात्याने "सिंधुरत्न योजना" (जिल्हा स्तरावरील मत्स्यव्यवसाय विकास योजना) राबवत आहात. या योजनेच्या अंतर्गत प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या धर्तीवर सागर मित्रांची नेमणूक करावी. स्थानिक भुमिपुत्रांना प्राधान्य देऊन शिक्षण पात्रतेनुसार (किमान पदवी/डिप्लोमा) निवड प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी, वेतनमान PMMSY प्रमाणेच किंवा त्याहून अधिक ठेवावे जेणेकरून सागर मित्रांना आर्थिक स्थैर्य मिळेल. यामुळे आपण या कळकळीच्या विनंतीकडे सहानुभूतीने पाहून तात्काळ निर्णय घ्यावा. मार्च २०२६ मध्ये योजना संपल्याने निर्माण झालेल्या रोजगार संकटातून आम्हाला वेळीच बाहेर काढण्यासाठी सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून सागर मित्रांची नेमणूक करून दिलासा द्यावा, अशी विनंती पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.










