
कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहर शिवसेना रिक्षा युनियनमधील चालकांसाठी तब्बल २ लाख रुपयांच्या अपघाती विमा योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम राबविला जात असून, रिक्षाचालकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी बुधवार, २५ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:०० या वेळेत महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या विम्यांतर्गत रिक्षाचालकांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे.
अपघाती मृत्यू झाल्यास विम्याची १००% रक्कम (२ लाख रुपये) वारसाला दिली जाईल. अपघातामध्ये कायमस्वरूपी १००% अपंगत्व आल्यास विम्याची १००% रक्कम मिळेल. अपघातामध्ये कोणत्याही दोन अवयवांचे (हात, पाय, डोळे) कायम अपंगत्व आल्यास विम्याची १००% रक्कम दिली जाईल. अपघातामध्ये कोणत्याही एका अवयवाचे (हात, पाय, डोळे) कायम अपंगत्व आल्यास विम्याची ५०% रक्कम (१ लाख रुपये) दिली जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित रिक्षाचालक कुडाळ शहर शिवसेना युनियनचा सभासद असणे अनिवार्य आहे, तसेच त्याचे वय ६० वर्षांच्या आत असावे.
नोंदणीसाठी खालील कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे:
१. पासपोर्ट साईज फोटो (१)
२. स्वतःच्या आधारकार्डची झेरॉक्स
३. पॅनकार्डची झेरॉक्स
४. वारसाच्या (Nominee) आधारकार्डची झेरॉक्स
तरी कुडाळ शहर शिवसेना युनियनमधील जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी या शिबिरात उपस्थित राहून विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदार शिरसाठ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी गोट्या चव्हाण (९६७३०११८७६) यांच्याशी संपर्क साधावा.










