
दोडामार्ग : उसप येथील मधलीवाडी ते पैलाडवाडी या मंजूर रस्त्याच्या कामाला दोन वर्षापासून टाळाटाळ होत असल्यामुळे सुरेश गवस यांनी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत हे उपोषण सुरू होते.
उसप गावातील मधलीवाडी ते पैलाडवाडी पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे हे काम दोन वर्षांपासून मंजूर आहे. या कामाचा मक्ताही मक्तेदाराला दिलेला आहे. मात्र, अद्याप पर्यंत या कामाला सुरुवात झाली नसून ग्रामपंचायत जाणून - बुजून टाळाटाळ करत असल्याचा आरोप सुरेश गवस यांनी निवेदनाद्वारे केला होता. तसेच हे काम तात्काळ सुरू न झाल्यास सोमवारपासून येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी ग्रामपंचायतीला दिला होता. मात्र, या निवेदनाची दखल घेतली न गेल्याने सुरेश गवस यांनी सोमवारपासून उपोषणास सुरुवात केली.










