सीएम फडणवीसांच अर्धवट काम कधी येणार पूर्णत्वास ?

▪️११ वर्ष भिजत घोंगडं | सभागृहातही प्रश्न उपस्थित ▪️सरकारकडून सावंतवाडीकरांची फसवणूक ?
Edited by: विनायाक गांवस
Published on: March 23, 2026 15:57 PM
views 132  views

सावंतवाडी : कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन होऊन तब्बल ११ वर्ष झाली. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत याची कुदळ मारली गेली. मात्र, ११ वर्षांनंतरही सावंतवाडीकरांना टर्मिनस केवळ कोनशीलेवरच दिसत आहे. नुकतच सावंतवाडीकरांच हे दुखणं भाजपच्या आमदार सुलभा गायकवाड आणि महायुतीचे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी सभागृहात मांडल. मात्र, अद्याप त्यावर हालचाली दिसत नाहीत. मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीसच कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या भूमिपूजनाच पुढे काय झालं ? ११ वर्ष अर्धवट राहिलेले काम कधी पूर्ण होणार ? असा सवाल सावंतवाडीकर अन् मुंबईस्थित चाकरमानी करू लागले आहेत.

गेली ११ वर्ष हा प्रश्न धूळखात पडल्याने हे पाप कुणाचे ? असा सवाल विचारण्याची दुर्देवी वेळ सावंतवाडीकरांवर आली होती. या सवालाला सुद्धा उत्तर मिळत नव्हते.  माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन झालेले असताना टर्मिनस काही अद्यापपर्यंत पूर्णत्वास आलेले नाही. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेन आंदोलन करूनही कोकण रेल्वे अन् सरकाराला काही जाग येताना दिसत नाही. आश्वासनापलिकडे सावंतवाडीकरांच्या हाती अद्याप काही लागलेलं नाही.

नुकतच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा चर्चेत आला. भारतीय जनता पक्षाच्याच कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील असुविधांचा पाढा वाचत कोरोना काळात काढून घेतलेले थांबे पूर्ववत करण्याची मागणी विधीमंडळात लक्षवेधी दरम्यान केली. तसेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले बांधकाम त्वरित पूर्ण करण्यात येऊन केंद्र शासनाच्या अमृत भारत स्थानक योजनेत त्याचा समावेश करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली. तसेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला कोकण रेल्वेच्या कुठल्याही सुविधा नाहीत. आवश्यक तो निधी कोकण रेल्वेकडे उपलब्ध नाही. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबे मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंत्रालयासह बैठक लावून कोकणी प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी महायुतीतील माजी मंत्री, शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी केली. खासदार नारायण राणे यांना विनंती करून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांबरोबर बैठक लावण्यात यावी अशीही मागणी केली. सत्ताधारी पक्षातील आमदारांनीच ही लक्षवेधी मांडली. मात्र, अद्याप यावर हालचाली झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच ११ वर्ष अर्धवट राहिलेलं काम पूर्णत्वास येणार तरी कधी ? की सावंतवाडीकर अन् मुंबईस्थित चाकरमान्यांच्या पदरी एका तापानंतरही स्थानकाबाहेरील कोनशिलेवर 'रेल्वे टर्मिनस' बघण्याची वेळ येणार ? असा सवाल उपस्थित होत आहे.