आयनोडे पुनर्वसन भूतनाथ सातेरी पंचायतन देवस्थानकडून २६ मार्चला रामनवमी उत्सव

Edited by: संदीप देसाई
Published on: March 23, 2026 15:51 PM
views 25  views

दोडामार्ग :  आयनोडे पुनर्वसन येथे श्री देव भूतनाथ सातेरी पंचायतन देवस्थानाच्या वतीने २६ मार्च रोजी श्री रामनवमी उत्सव व पुढे एकादशी सप्ताह आणि हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना परिसरातील भाविक व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमांची सुरुवात गुरुवारी २६ मार्च रोजी श्री रामनवमी निमित्त होणार आहे. दुपारी १२.०० वाजता श्री रामजन्मोत्सव, त्यानंतर १२.३० वाजता आरती व तीर्थप्रसाद, तसेच दुपारी १.०० वाजता महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. रात्री १०.०० वाजता श्री देव भूतनाथ प्रसादिक नाट्यमंडळ, आयनोडे यांच्यावतीने ‘सिंह गर्जला रणी’ हे ऐतिहासिक नाटक सादर करण्यात येणार आहे. यानंतर रविवार, २९ मार्च रोजी एकादशी सप्ताहाचा प्रारंभ होणार असून दुपारी १२.०० वाजता विविध भजन मंडळांच्या भजनांचा कार्यक्रम होईल. सोमवार ३० मार्च रोजी सकाळी १०.०० वाजता सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. त्याच दिवशी रात्री १०.०० वाजता ‘न्यायाघरी अन्याय’ हा सामाजिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

तसेच बुधवारी १ एप्रिल रोजी हनुमान जयंती निमित्त रात्री ९.०० वाजता श्रींच्या चरणाजवळील श्रीफळ, प्रसाद, ओटी व इतर वस्तूंच्या पाहुणीचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर रात्री १२.०० वाजता श्री देव भूतनाथ प्रसादिक नाट्यमंडळ, आयनोडे यांच्यावतीने महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग ‘कालिका अवतार’ सादर करण्यात येणार आहे.

गुरुवार, २ एप्रिल रोजी पहाटे ५.०० वाजता हनुमान जन्म सोहळा, सकाळी ८.०० वाजता आरती व तीर्थप्रसाद देऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन श्री देव भूतनाथ सातेरी पंचायतन देवस्थान विश्वस्त समिती व ग्रामस्थ, आयनोडे पुनर्वसन यांच्या वतीने करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.