
वेंगुर्ले : वेंगुर्ला नगरपरिषद महिला व बालकल्याण विभाग यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी महिलांसाठी घेण्यात आलेल्या ग्रुप डान्स स्पर्धेत फाइव स्टार ग्रुप वेंगुर्ला यांनी तर वेशभूषा स्पर्धेत शुभ्रा शिरवलकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिला व स्वछता कर्मचारी महिलांचा सन्मान करण्यात आला. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला बालकल्याण सभापती गौरी मराठे, उपसभापती रिया केरकर, सर्व नगरसेविका कार्यक्रमाच्या अध्यक्ष समाजसेविका मंगलताई परुळेकर, प्रज्ञा परब, अस्मिना मकानदार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी महिला सक्षमीकरण, सबलीकरण, नारीशक्ती गौरव, स्त्री जीवनाचे विविध रंग, एक स्त्री अनेक रूपे या थीमवर आधारित ग्रुप डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत "फाइव स्टार ग्रुप वेंगुर्ला" यांनी प्रथम क्रमांक, स्वाभिमानी महिला बचत गट म्हाडा कॉलनी यांनी द्वितीय तर सरस्वती बचत गट यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच स्वच्छता, आरोग्य व स्त्री शक्ती थीम यावर आधारित विवाहित महिलांसाठी घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत शुभ्रा शिवलकर (राजमाता जिजाऊ) यांनी प्रथम, अंजली मोर्डेकर (पर्यावरण रक्षक स्त्री) यांनी द्वितीय तर अमिता गोसावी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच या कार्यक्रमात नगरपरिषदेच्या स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तर कर्तृत्ववान महिला मंगलताई परुळेकर, दिव्यांग क्रिकेटर स्मिता गावडे व महिला पोलीस तेजस्वी धुरी यांचा सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले.










