केमिकलला फाटा, निसर्गाला सलाम !

विद्या मंदिर हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक रंगपंचमी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 20, 2026 12:28 PM
views 26  views

कणकवली : येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये सामाजिक व सांस्कृतिक बांधिलकी जपत यंदाही पर्यावरणपूरक रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रासायनिक रंगांमुळे होणारे दुष्परिणाम टाळणे आणि निसर्गाचे संवर्धन करण्याचा संदेश देत गेल्या सहा वर्षांपासून प्रशालेत हा स्तुत्य उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.


यावेळी प्रशालेचे उपक्रमशील कलाशिक्षक व पर्यावरण सेवा योजनाप्रमुख प्रसाद राणे यांनी विद्यार्थ्यांना निसर्गातील विविध घटकांपासून ओले रंग तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. गुलमोहराची पाने, झेंडूची फुले, बीट, गाजर आणि पालक यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून सुरक्षित रंग कसे तयार करायचे याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले.

बाजारात उपलब्ध असलेले रासायनिक रंग त्वचेसाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे डोळ्यांची जळजळ, त्वचाविकार आदी समस्या उद्भवतात. याउलट नैसर्गिक रंग पूर्णतः सुरक्षित असून पर्यावरणालाही अनुकूल असतात. विद्यार्थ्यांनी असे रंग वापरण्याबरोबरच समाजातही याबाबत जनजागृती करावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याची माहिती प्रसाद राणे व हरित सेना प्रमुख सौ. विद्या शिरसाट यांनी दिली.

दिलेल्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी घरीच नैसर्गिक रंग तयार करून आणले होते. बुधवार, १८ मार्च रोजी विद्यार्थी व शिक्षकांनी या रंगांची उधळण करत रंगपंचमीचा आनंद लुटला. यावेळी मुख्याध्यापक पी. जे. कांबळे व पर्यवेक्षक ए. व्हि. वनवे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. पर्यावरणाचा समतोल राखत आणि सामाजिक ऐक्य जपत भारतीय सण साजरे करण्याचा मोलाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

याप्रसंगी जे. जे. शेळके, संदीप नागभिडकर, महानंद पवार, सुरज पवार, पृथ्वीराज बर्डे, नेहा सावंत, सौ. तेली, सौ. मिठारी, विद्या शिरसाट, वेदांती तायशेटे, मधुरा मुंडले, महेश्वरी मठकर, लिपिक मनीषा पाटील, श्री. अरुण नाईक साटम तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.