
कणकवली : गुढीपाडवा व हिंदू नववर्षानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे गुरुवारी सायंकाळी कणकवली शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात्रेतील आकर्षक चलचित्र देखावे आणि पारंपरिक वेशभूषा विशेष लक्षवेधी ठरली. या यात्रेतून सामाजिक सलोखा आणि स्वच्छतेचा संदेश देण्यात आला असून हिंदू संस्कृतीचे दर्शन घडले.
गेल्या काही वर्षांपासून शहरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्याची परंपरा सुरू असून यंदाही मोठ्या उत्साहात ही यात्रा पार पडली. यात्रेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करण्यात आला. ढोल-ताशांचा गजर, लेझीम आणि झांजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरत परिसर दणाणून सोडला. पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला, आबालवृद्ध तसेच बच्चे कंपनी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते. महिलांची बाईक रॅली हे स्वागत यात्रेचे विशेष आकर्षण ठरले.
सिंधुगर्जना पथकातील युवक-युवतींनी पारंपरिक वेशभूषेत ढोल-ताशांचा गजर करत उत्साह वाढवला. भारत मातेचा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. दुचाकींवर भगवे झेंडे लावत पारंपरिक वेशात सहभागी झालेल्या महिला भगिनींचा उत्साह विशेष दखलपात्र होता. महिला व पुरुष पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते. भगवे ध्वज, चित्ररथ, तसेच भगवे फेटे परिधान केलेल्या सहभागीमुळे यात्रेला अधिक रंगत आली.
तेलीआळी येथे भगवे पताके व झेंडे लावून या यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेली ही शोभायात्रा आप्पासाहेब पटवर्धन चौक, बाजारपेठ मार्गे विद्यामंदिराच्या पटांगणावर पोहोचली. त्यानंतर शिवारा मंदिराजवळ यात्रेचा समारोप करण्यात आला. या दिमाखदार स्वागत यात्रेमुळे कणकवली शहर भगवेमय झाले होते.










