
वेंगुर्ले : मी शासनाचा प्रतिनिधी असलो तरी सिंधुदुर्गातील शेतकरी बागायतदारांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा काजू फळांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने मात्र याबाबत दिलेला अहवाल चुकीचा आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर बोलून याबाबत पुन्हा अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत. दरम्यान उद्या शुक्रवार २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी मंत्रालयात याच विषयावर संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत खास बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील काही बागातदार प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. बागायतदारांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी १००% प्रयत्न करू आणि मिळऊन देऊ असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ले येथील आंबा बागायतदार शेतकरी शिष्टमंडळाला दिला.
वेंगुर्ले तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकरी यांच्या एका शिष्टमंडळाने कणकवली येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी भेट घेऊन आंबा नुकसानी बाबत चर्चा केली. त्या चर्चेनंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी उद्या मंत्रिमंडळात या विषयी बैठक बोलावल्याचे सांगितले. यावेळी शिष्टमंडळामध्ये जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह आंबा बागायतदार मंच अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, रामेश्वर ट्रान्सपोर्ट चे जनार्दन पडवळ, आंबा बागायतदार जगन्नाथ सावंत, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना अध्यक्ष श्यामसुंदर राय, दाजी परब, ॲड. प्रकाश बोवलेकर, पंचायत समिती सदस्य विष्णु फणसेकर, नितीन मांजरेकर, नगरसेवक प्रीतम सावंत, प्रणव वायंगणकर यांच्या सह अन्य बागायतदार उपस्थित होते. यावेळी चर्चा झाल्यानंतर बागायतदार यांच्यावतीने निवेदन मंत्री राणे यांना देण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, चालू वर्षी आंबा व काजू पीकाला वेळेवर व भरपूर मोहोर नोव्हेंबर मध्येच आला होता त्यामुळे यावर्षी तरी थोडेफार उत्पन्न मिळेल जेणेकरुन मागील चार वर्षात झालेल्या नुकसानीपैकी थोडेतरी नुकसान भरुन निघेल अशी आशा निर्माण झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पण मोठ्या प्रमाणावर बागा घेतल्या होत्या. मात्र पाऊस उशिरापर्यंत राहीला तसेच तापमानात सतत बदल होत राहीला.
डिसेंबर मध्ये रात्रीचे तापमान १२ ते १५ से. ग्रे. व दुपारचे तापमान २५ ते २८ सें. ग्रे. इतके राहीले. परिणामी फळ धारणा झाली नाही. नर तुरा मोठ्या प्रमाणावर आला व मोहोर काळा पडायाला सुरुवात झाली. बागायतदारांनी महागडी किटकनाशके किमान सात वेळा वापरुनही त्याचा काही परिणाम झाला नाही व संपूर्ण मोहोर काळा ठिक्कर पडला. यंदा प्रथमच दव (दवबिंदू) मोठ्या प्रमाणावर पडला असून अजूनही दव पडत आहे. परिणामी काळा झालेला मोहोर झाडूनही फांदीवरुन खाली पडत नाही. जी काही थोडी फार फळे वाचली होती ती पण आता झाडांना नवीन मोहोर मोठया प्रमाणावर आल्याने गळून पडली आहेत. एकंदरीत चालू वर्षी ५ टक्के पण पीक हाती येण्याची शक्यता नाही. शिवाय थंडीचे प्रमाण अजूनही वाढते आहे. जी परिस्थिती आंबा पिकाच्या बाबतीत आहे तिच परिस्थिती काजू पिकाबाबत आहे. काजूचा मोहोर पण काळा पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे आंबा व काजू बागायतदार पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे.
खत व औषधासाठी बागायतदार मोठ्या प्रमाणावर सहकारी सोसायटीमधून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून तसेच राष्ट्रियीकृत बँकाकडून कर्ज घेतले तसेच आंब्यांची औषधे ही बरेच बागायतदार उधारीवर घेत असतात. यंदाचे परिस्थिती विचारात घेता येणाऱ्या उत्पन्नातून औषधाचा खर्च ही भरुन निघणे कठीण आहे. किटकनाशकाची बिले प्रलंबित आहेत. बँकेची कर्जफेड होणेही कठीण आहे. बेकारीमुळे बराचसा तरुण वर्ग आंबा व्यवसायात उत्तरला आहे. मात्र असे सतत नुकसान झाल्यास बागायतदार आत्महत्येकडे वळण्याचा मोठा धोका आहे.
तरी चालू वर्षी जो मोहोर काळा पडला त्यावर त्वरीत संशोधन होऊन मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. जो मोहोर काळा पडला आहे तिकडे नवीन मोहोर आता येणार नाही त्यामुळे चालू वर्षी जे नुकसान झाले त्यासाठी मदत त्वरीत मिळणे आवश्यक आहे. आपण कृषी विभाग व संशोधन केंद्र यांची एक समिती गठीत करुन बागांची पाहणी करुन त्याचा अहवाल तात्काळ देणेबाबत आदेश दिले आहेत. त्याबद्दल आपले विशेष अभिनंदन. यावर्षी आंबा व काजूचे मागील ५० वर्षात झाले नाही असे अभुतपूर्व असे नुकसान झाल्याने कृषी विषयक मुल्यांकनाप्रमाणे हेक्टरी रु ३ लाख ३४ हजार रुपये नुकसान भरपाई २ हेक्टरी मर्यादा न घालता सरसकट देणेत यावी ही विनंती. नैसर्गिक आपत्ती गृहीत धरुन ही मदत मिळावी. तसेच नुकसान भरपाई रक्कम देताना ज्य व्यापाऱ्यांनी कराराने बागा घेऊन त्यावर खते, किटकनाशके यावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. त्यामुळे ही नुकसान भरपाईची रक्कम आंबा व काजू बागायतदारांना न मिळता ज्या व्यापाऱ्यांनी स्टैंप पेपरवर करार केला आहे अशा व्यापाऱ्यांना देण्यात यावी. त्यासाठी करार रजिस्टर करण्याची अट घालण्यात येऊ नये ही विनंती. तसेच सामायिक सातबारा असल्यास त्यापैकी एका सहहिस्सेदारास नुकसान भरपाई अदा करताना इतर सहहिस्सेदारांच्या समत्तिची अट न घालता हमीपत्र घेऊन रक्कम देण्यात यावी ही विनंती. असे या नियोजनात नमूद करण्यात आले आहे.










