
वेंगुर्ला : जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळपासून सर्वच मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून सकाळी 7.30 ते 9.30 पर्यंत वेंगुर्ला तालुक्यात 9.98 टक्के मतदान झाले. वेंगुर्ला तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 जागांसाठी आज मतदान घेण्यात येत आहे. यासाठी वेंगुर्ला तालुक्यामध्ये 87 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान, आज शनिवारी सकाळी 7.30 वाजल्यापासून तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदानाला प्रारंभ झाला.
पहिल्या दोन तासांत जि.प. आणि पं.स.साठी 3 हजार 603 पुरूषांनी तर 2 हजार 261 स्त्रीयांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण 9.98 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, सध्याचे दिवस हे लग्नसराईचे आहेत. त्यामुळे काही ठिकाणी लग्नाची धामधूम पहायला मिळत आहे. लग्नाला जाण्यापूर्वी माधवी दाभोलकर या नववधूने परूळे मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजाविला आणि त्यानंतरच लग्न मंडपात रवाना झाली.










