
वेंगुर्ले : आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत. त्याकाळी आमचा जन्म दुर्गम भागात झाल्याने आम्ही शाळेत, महाविद्यालयात चालत जायचो. वडापाव वर दिवस काढले. मात्र तुम्ही भाग्यवान आहात. यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील वेळ वाया न घालवता. एखादे ध्येय गाठण्यासाठी व स्वतःचे भवितव्य घडवण्यासाठी मनात निश्चय करून पुढील वाटचाल करावी. बॅ खर्डेकर महाविद्यालय असंख्य वर्ष कार्यरत आहे. त्यावेळी जर हे महाविद्यालाय झाले नसते तर अनेक मुले घडली नसती. शिस्त काय असावी हे या महाविद्यायातून पाहायला मिळते. तुम्ही केव्हाही हाक द्या, मी सदैव तुमच्या सोबत आहे असे अभिवचन भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ले येथे दिले.
बॅ बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्लाचे विद्यार्थी यांच्यावतीने येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात आयोजित "नादब्रम्ह" सांस्कृतिक महोत्सव २०२६ च्या दुसऱ्या व अंतिम दिवसाच्या कार्यक्रमाचे उदघाटन भाजपचे युवा नेते विशाल परब व पत्नी वेदिका परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने, छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. सर्वप्रथम विशाल परब यांनी बॅ खर्डेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर कार्यक्रम स्थळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ धनराज गोस्वामी, कलावलयचे बाळू खामकर, युवा महोत्सव समिती चेअरमन प्रा. पी एम देसाई, विद्यार्थी प्रतिनिधी कादंबरी म्हस्के, नित्यानंद वेंगुर्लेकर , हिना बागवे आदी उपस्थित होते.यावेळी महाविद्यालयाच्या वतीने विशाल परब, वेदिका परब व बाळू खामकर यांच्या सन्मान करण्यात आला. तर विशाल परब यांच्या हस्ते विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे तर निवृत्त शिपाई शेखर माडकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विशाल परब व वेदिका परब यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
वेदिका परब म्हणाल्या, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मन भरून आले. बॅ खर्डेकर महाविद्यालय आज संपूर्ण कोकणचा अभिमान ठरले आहे. बॅ खर्डेकर यांनी जो दीप प्रजवलीत केला तो तितक्याच तेजाने उजळतो आहे. ग्रामीण भागातील गरीब, होतकरू, शेतकरी, मच्छिमार कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी या महाविद्यालयातून मिळत आहे. याठिकाणी केवळ शिक्षण नाही तर संस्काराची परंपरा आहे. यासाठी या महाविद्यालयाचे ऋण जपत, समाजाला काहीतरी देणारे नागरिक व्हा. हीच बॅ खर्डेकर यांच्या विचारांना आदरांजली ठरेल. शिक्षण घेत असताना तुम्ही स्किल डेव्हलपमेंट वर भर द्या. कितीही यशस्वी झाला तर गुरूचा विसर पडू देवू नका असे मार्गदर्शन सौ परब यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळकर यांनी केले.










