
वेंगुर्ले : पोलीस पाटील पद ऐतिहासिक काळापासून आजपर्यंतच्या प्रशासन व्यवस्थेत सन्मानचे पद आहे. या पदाची जबाबदारी प्रामाणिक निष्ठेने संभाळत पोलीस पाटलांनी पदाचा मानसन्मान ठेवत काम करावे. समाज व प्रशासन यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील फार महत्वाचे आहेत, असे प्रतिपादन वेतोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जयवंत राय यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना केले.
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना शाखा वेंगुर्लेतर्फे सावंतवाडी उपविभाग (प्रांत) पोलीस पाटील संघटनेच्या संकल्पनेतून वेंगुर्ले रामघाट येथील सातेरी मंगल कार्यालय येथे पोलीस पाटील दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, प्रांत पोलीस पाटील विभाग अध्यक्षा जागृती गावडे, उभादांडा सरपंच नीलेश चमणकर, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, आरवली सरपंच समीर कांबळी, सावंतवाडी पोलीस पाटील संघटना तालुका उपाध्यक्ष नितीन नाईक, दोडमार्ग तालुका संघटक सचिन सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष तानाजी सावंत, दोडामार्ग तालुकाध्यक्ष संजय गवस, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मधुसुदन मेखी, प्रतीक्षा मुंडये, सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर आदींचा समावेश होता.
प्रशासन व गावाची नाळ जोडणारा दुवा: निगर्स ओतारी
प्रशासन व गावाची जोडणारी नाळ म्हणजेच पोलीस पाटील. प्रशासनाचे ते कान, नाक आणि डोळे आहेत. त्यांच्या विश्वासावर प्रशासनाचे चाक पुढे चालते. गावातील शांतता, सुव्यवस्था ही पोलीस पाटलांच्या योगदानामुळेच राखली जाते. गावातील प्रत्येक गंभीर घटनेवेळी प्रथम हजर असतो तो म्हणजे पोलीस पाटील. पूर, आग अपघात वा नैसर्गिक आपत्तीवेळी लोकांना मदत पोलीस पाटील करतो. समाजातील खरा नायक पोलीस पाटील आहे. पोलीस प्रशासनातील मनुष्यबळाची मर्यादेच्या पार्श्वभूमीवर आम्हाला पोलीस पाटलांची जी मदत मिळते ती अविश्वसनीय आहे, असे गौरवोद्गार पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी काढले.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले. पोलीस पाटलांनी एकत्र येत पोलीस पाटील दिन साजरा करणे ही अलौकीक गोष्ट आहे. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले आहे.
पोलीस पाटलांच्या दाखल्याला फार महत्त्व : वासुदेव नाईक
गटविकास अधिकारी वासुदेव नाईक म्हणाले, गावामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहाण्याची जबाबदारी पोलीस पाटीलांवर असते. ही जबाबदारी ते सामाजिक भावनेतून पार पाडतात. गावातील खडानखडा प्रत्येक कुटुंबाची तेथील वादाचा, आणि तो वाद कशा पद्धतीने मिटेल याची कल्पना पोलीस पाटलालाच असते. खूप चांगल्या पद्धतीने पोलीस पाटील समन्वयकाची भूमिका पार पाडत असतो. विविध कामांसाठी लागणारे पोलीस पाटलांचे दाखले म्हणजे फार महत्त्वाचे आहेत. गावातील जनतेच्या सेवेसाठी तत्काळ उपलब्ध होणाऱ्या पोलीस पाटलांचे अस्तित्व फार महत्त्वाचे आहे.
शिवाजी महाराजांच्या सुराज्यापासून विश्वासार्ह पद : नीलेश चमणकर
उभादांडा गावचे सरपंच नीलेश चमणकर म्हणाले. शिवाजी महाराजांच्या काळापासून पोलीस पाटील हे विश्वासार्ह पद कार्यरत आहे. इंग्रजांनीही या पदावर शिक्कामोर्तब केले. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही पोलीस पाटील पद ठेवले. अन् जातनिहाय त्यांना आरक्षण देत ती व्यवस्था आजही सुरू आहे. पूर्वी मोठ्या लोकसंख्येच्या गावाला एकच पोलीस पाटील असायचा. त्यावेळी पोलीस पाटलांना खरा त्रास सहन करायला लागायचा. पण तरीही त्यांचं काम हे गावातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचे असायचे. आजही ते सुरू आहे. आमच्या गावचे पोलीस पाटील विजय नार्वेकर यांच्याकडे १३ महसूल गावांबरोबच वेंगुर्ले शहराचा अधिभार आला होता. तरी ते काम सुयोग्य पद्धतीने करीत होते. म्हणून त्यांचा - गौरव प्रशासनाकडून करण्यात आला. आता तर प्रत्येक महसुल गावासाठी पोलीस पाटील शासनाने नियुक्त केले आहेत.
यावेळी सावंतवाडी पोलीस पाटील प्रांत विभागाच्या अध्यक्ष जागृती गावडे - यांनीही मनोगत व्यक्त केले. समस्या किंवा आपण एखादा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन किंवा आपल्याला मदतीची हाक कोणी कोणाकडे तरी मागायची. आपल्याला एक घर असलं पाहिजे. यासाठी या कमिटीचा सर्व खटोटोप - होता आणि निश्चितपणे आम्ही तो पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे एक गाव एक पोलीस पाटील आता महसूल गावाप्रमाणे पोलीस पाटलांची भरती झालेली - आहे. नवीन आलेले पोलीस पाटील उच्चशिक्षित आहेत. त्यांची विचारधारा, बुद्धिमत्ता आणि कल्पकतेचा फायदा होत आहे. जुन्या पोलीस पाटलांचा अनुभवही महत्वाचा आहे.
यावेळी व्यासपिठावरील मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. निवृत्त पोलीस - पाटील लवू तुळसकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आजगावच्या पोलीस पाटील - निकिता पोखरे यांनी केले. सूत्रसंचालन तुळस पलतडच्या पोलीस पाटील चारूता परब यांनी केले, तर आभार पाल गावच्या पोलीस पाटील ऋतिका नाईक यांनी मानले.










