सचिन देसाईंनी पंचायत समिती निवडणूक लढवावी ; कार्यकर्त्यांची मागणी

Edited by: दिपेश परब
Published on: October 17, 2025 11:03 AM
views 448  views

वेंगुर्ला : नुकतीच जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण जाहीर झाली आणि सर्वच पक्षांकडून आगामी होणाऱ्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली. यात म्हापण जिल्हा परिषद साठी सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने या मतदार संघात इच्छुक असलेल्या अनेक दिग्गजांची नाराजी झाली आहे. यात शिंदे शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यां कडून होत आहे. मात्र याबाबत सचिन देसाई कोणती भूमिका घेतात व पक्ष त्यांना संधी देतो का हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.

आरक्षण जाहीर होताच निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. सर्वच ठिकाणी इच्छुक उमेदवार आतापासूनच कामाला लागले आहेत. नाक्यानाक्यावर या निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. मागील ५ वर्षासाठी पडलेल्या आरक्षणाचा विचार करता आता पडलेली आरक्षण ही मागील आरक्षणे विचारात घेऊन पडतील अशी सर्वांची इच्छा होती. यामुळे ठिकठिकाणी अनेक इच्छुकांनी अगोदरच मोर्चेबांधणी केली होती. मात्र निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार मागील आरक्षण विचारात न घेता ही नवीन आरक्षण प्रक्रिया या निवडणुकीपासून सुरू झाल्याने या जिल्हा परिषद व पंचायत समितीची आरक्षण पडल्यानंतर काही ठिकणी आनंद तर काहींची निराशा झाली. 

यात म्हापण जिल्हा परिषद मतदार संघाचा विचार करता याठिकाणी सर्वसाधारण आरक्षण पडणार अशी अपेक्षा असताना सर्वसाधरण महिला जागेसाठी हे आरक्षण राखीव झाल्याने अनेकांची निराशा झाली. यात शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई हे इच्छुक होते. या मतदार संघात मागील काही वर्षे त्यांनी त्या पद्धतीने कामही सुरू केले होते. मात्र महिला जागेसाठी हे आरक्षण पडल्याने त्यांची निराशा झाली आहे. यात परुळे पंचायत समिती साठी सर्वसाधारण आरक्षण पडल्याने या जागेवरून सचिन देसाई यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. सचिन देसाई यांचे त्या मतदार संघात चांगले काम असून तगडा जनसंपर्क आहे. मात्र यावर सचिन देसाई कोणता निर्णय घेतात व शिवसेना पक्ष त्यांना संधी देतो का हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.