आत्माच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचा प्रकल्प राबवणार : नितीन मांजरेकर

आत्मा'च्या वेंगुर्ले अध्यक्षपदी नितीन मांजरेकर बिनविरोध
Edited by: दिपेश परब
Published on: July 22, 2025 20:02 PM
views 285  views

वेंगुर्ले : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) वेंगुर्ले तालुका अध्यक्षपदी आडेली येथील आंबा बागायतदार तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांची निवड करण्यात आली. मंगळवारी झालेल्या आत्मा समितीच्या बैठकीत ही बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर शिवसेनेचे जिल्हा समन्वयक  सचिन वालावलकर यांनी नितीन मांजरेकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना मांजरेकर म्हणाले, वेंगुर्ले तालुक्यात आंबा हे प्रमुख पीक आहे. ज्यावर तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मात्र, अलिकडच्या १०-१५ वर्षात आंबा पिकाला वारंवार बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. आंब्याला हवा तसा दरही मिळत नाही. त्यामुळे येथे पिकणारा आंबा प्रोसेस व्हावा व त्यापासून विविध प्रकारची उत्पादने घेता यावीत यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मोठा प्रकल्प राबविण्याचा आपला प्रयत्न असेल, असेही नितीन मांजरेकर यावेळी म्हणाले.

समितीचे सचिव तथा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धनंजय गोळम यांनी प्रास्ताविक केले. आत्मा समिती वेंगुल्याचे मावळते अध्यक्ष तथा पेंडुर गावचे प्रगतशील शेतकरी गुंडू उर्फ देवा कांबळी, तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, आत्माचे सदस्य बुधाजी उर्फ उमेश येरम, दिलीप मठकर, संजना परब, आकांक्षा मांजरेकर, सागर गडेकर, संध्या राणे, सुजाता देसाई, महेश सामंत, सुहासिनी वैद्य, बाळकृष्ण गाडगीळ, किर्तीमंगल भगत, युवराज ठाकुर, संजय गावडे, सुधीर आरोलकर आदी यावेळी उपस्थित होते.

वेतोऱ्यातील प्रगतशील शेतकरी बाळकृष्ण गाडगीळ, भोगवे गावचे माजी सरपंच महेश सामंत, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्य असलेल्या आसोली गावच्या सुजाता देसाई, जिजामाता पुरस्कार प्राप्त मातोंड- पेंडूरच्या सुहासिनी वैद्य, वेतोरे येथील शेतकरी कृषी गटाचे युवराज ठाकुर, मावळते अध्यक्ष देवा कांवळी, किर्तीमंगल भगत, संध्या राणे, दिलीप मठकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण यांनी आत्माच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील कृषी क्षेत्र कसे प्रगत करता येईल याबाबतचे मार्गदर्शन केले. 

शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर यांनी यावेळी भेट देऊन नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन मांजरेकर यांना शुभेच्छा दिल्या. मंत्रालय पातळीवर कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्यासाठी आपले संपूर्ण सहकार्य लाभेल. आत्माद्वारे तालुक्यात नवीन तंत्रज्ञानाचे विस्तारिकरण करण्यासाठी पुष्कळ वाव आहे. वेंगुर्ल्यात भाजीपाला व फुलांच्या शेतीचा विकास व्हावा, धन लावगड पद्धतीने कृषी क्षेत्रात बदल घडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत व तालुक्यातील शेतकऱ्यांचा व्यावसायिक शेती करण्याकडचा दृष्टीकोन प्रबळ व्हावा यासाठी आत्माने काम करावे, असे ते यावेळी म्हणाले. सभेचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन तंत्रज्ञान व्यवस्थापक धनंजय गोळम यांनी केले.