वेंगुर्ले तालुका चर्मकार समाज स्नेहमेळावा उत्साहात..!

चर्मकार समाजातील बांधवांनी उच्च शिक्षणाची परंपरा सुरूच ठेवावी : माजी आमदार शंकर कांबळी
Edited by: दिपेश परब
Published on: August 28, 2023 20:33 PM
views 440  views

वेंगुर्ले :  चर्मकार समाजाने उच्चशिक्षित होऊन अनेक क्षेत्रात आपले नावलौकिक केले आहे. या समाज्याच्या ज्या काही समस्या प्रलंबित असतील त्या सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. समाजाने उच्च शिक्षणाची परंपरा सुरूच ठेवावी, असे प्रतिपादन वेंगुर्ले-कुडाळचे माजी आमदार शंकर कांबळी यांनी केले.

वेंगुर्ले तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळाचा स्नेहमेळावा येथील साई दरबार हॉल येथे तालुकाध्यक्ष सहदेव शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी विशेष अतिथी या नात्याने ते बोलत होते. व्यासपीठावर वेंगुर्ल्याचे माजी आमदार शंकर कांबळी, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्ष अर्चना घारे-परब, गोवा येथील निवृत्त आरटीओ अधिकारी विनोद आर्लेकर, चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, सचिव चंद्रसेन पाताडे, प्रवक्ते के. टी. चव्हाण, महिला पदाधिकारी उर्मिला वेंगुर्लेकर, माजी जिल्हाध्यक्ष ऍड. नंदन वेंगुर्लेकर, ऍड. अनिल निरवडेकर, सावंतवाडी शाखाध्यक्ष गणेश म्हापणकर, मुंबई येथील उद्योजक दिगंबर आर्लेकर, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, गोवा येथील उद्योजक विष्णू कोरगावकर, सौ. विनिता कोरगावकर, पोलीस अधिकारी शेखर दाभोलकर, भालचंद्र दाभोलकर, म्हापण गावच्या सरपंच सौ. आकांशा म्हापणकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष योगेश कुबल, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, समाजाचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष उत्तम चव्हाण, गुरुप्रसाद चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

    मान्यवरांच्या हस्ते स्नेहमेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पूर्व माधमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती धारक विध्यार्थी, दहावी, बारावी, पदवी व तत्सम अभ्यासक्रमातीला गुणवंत विद्यार्थी, विशेष प्रविण्यप्राप्त विद्यार्थी, पदोन्नती मिळविणारे समाजबांधव, विशेष कर्तृत्व प्राप्त करणारे समाजबांधव, आंतरजातीय विवाह करणारी जोडपी, महिला बचत गटाच्या पदाधिकारी, राजकारणात विविध पदावर कार्यरत असलेले समाजबांधव, 2019 पासून सेवानिवृत्त झालेले समाजबांधव व गेली पंधरा वर्ष एकत्र संसार करणाऱ्या सासू-सुना यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

.  चर्मकार समाजातील विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा लवकरच घेण्यात येईल. चर्मकार समाजाच्या अस्मितेचे प्रतिक असणारे चर्मकार समाजभवन ओरोस - हुमरमळा येथे बांधण्यात येत आहे. विविध सुविधानी युक्त असणाऱ्या या समाजभवनास प्रत्येकाने आर्थिक मदत करावी, असे आवाहन यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी केले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या समाजाच्या समस्या सोडविण्यात येतील. समाजभवनासाठी भरीव सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही सचिन वालावलकर यांनी दिली. चर्मकार समाजातील महिलांना विविध क्षेत्रात व राजकारणातही काम करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केली. शिका, संघटित व्हा आणि स्वयंप्रकाशित व्हा असा संदेश देणाऱ्या संत रोहिदासांच्या चर्मकार समाजाने सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आहे. चर्मकार समाज शिक्षित आहे आणि संघटितही आहे. आता स्वयंप्रकाशित होऊन समाजातील उपेक्षित वर्गाला विकासाच्या प्रक्रियेत आणण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन कुडाळचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी वेंगुर्ले येथे केले.

   ऍड. नंदन वेंगुर्लेकर यांनी चर्मकार समाजाला राजकारणात स्थान मिळायला हवे, असे मत व्यक्त केले. ऍड. अनिल निरवडेकर यांनी वेंगुर्ले शाखेचा स्नेहमेळावा नंबर वन झाला असल्याची कौतुकाची थाप दिली. इर्शाद शेख, आत्माराम ओटवणेकर, विष्णुदास कोरगावकर, सहदेव शिरोडकर यांनीही विचार मांडले. स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी तालुका शाखा कार्यकारिणीने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा पदाधिकारी उदय शिरोडकर, प्रास्ताविक उत्तम चव्हाण यांनी केले तर शेवटी आभार तालुका सचिव महेश चव्हाण यांनी मानले.