वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाची 16 डिसेंबर रोजी निवडणूक

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या तालुक्यातील निवडणूक
Edited by: दीपेश परब
Published on: November 14, 2022 18:38 PM
views 150  views

वेंगुर्ला : सावंतवाडी, मालवणनंतर आता वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ अन्वये वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक 16 डिसेंबर रोजी होणार आहे. एकूण 15 जागांसाठी ही निवडणूक असून नामनिर्देशन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर दुपारी  3 वाजेपर्यंत आहे. दरम्यान सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार निवडण्यास प्रारंभ झाला आहे.

सावंतवाडी आणि मालवण या दोन्ही खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत बदलती राजकीय समीकरणे समोर येऊन निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे वेंगुर्ले खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपचे पदाधिकारी आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या तालुक्यातील ही निवडणूक असल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

या खरेदी विक्री संघामध्ये सहकारी संस्था मतदारसंघातून 7, व्यक्तिगत मतदार संघातून 3, अनुसूचित जाती जमाती मधून 1, विमुक्त जाती व भटक्या जमाती मधील 1, इतर मागास मधून 1 आणि महिला राखीव मधून 2 असे एकूण 15 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. एकूण 2934 मतदार असून एकूण प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर जास्त उमेदवार रिंगणात राहिल्यास 16 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असून त्यानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.