
वेंगुर्ला : वेंगुर्ला बंदर येथे वादळी वाऱ्यामुळे छोटी होडी बुडून झालेल्या दुर्घटनेतील बेपत्ता असलेले उर्वरित २ खलाशी आझान मुनीलाला कोल (१६) व चांद गुलाम महम्मद (१९) या दोघांचे मृतदेह आज माध्यरात्री व सकाळी आढळून आले आहेत.
गुरुवार दिनांक २३ मे रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ला बंदर पासून १०० ते १२० मीटर अंतरावर ही दुर्घटना घडली होती. येथील मासे व्यावसायिक बाबी रेडकर यांच्या मासेमारीच्या लॉन्चवर हे खलाशी जाण्यासाठी निघाले होते. मात्र अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने व उधाणाने त्यांची होडी भरकटली. यावेळी होडी बंदर वरीलच एका दगडाला आदळून होडीवरील सर्व खलाशी समुद्रात फेकले गेले व होडी समुद्रात बुडाली. वाऱ्याचा वेग एवढा होता की सर्व खलाशी वेगवेगळ्या दिशेला वाहून गेले. यातील ३ खलाशी आपला जीव वाचवून वेंगुर्ला बंदरात पोहोले होते. तर बुडालेल्या चार खलाशांपैकी लॉन्च वरील मुख्य तांडेल रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेरकर (६६) यांचा मृतदेह २४ रोजी सकाळी १० वाजता मोचेमाड समुद्रात मिळाला. तर खलाशी शिवराम कोल (२२) याचा मृतदेह सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सागरेश्वर समुद्रकिनारी आढळून आला होता.
दरम्यान या दुर्घटनेतील बेपत्ता असलेले उर्वरित २ खलाश्यापैकी चांद गुलाम महम्मद (१९) याचा मृतदेह मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास नावाबाग समुद्रकिनारी तर आझान मुनीलाला कोल (१६) याचा मृतदेह आज सकाळी सागरेश्वर समुद्रकिनारी आढळून आला. पोलिसांनी हे चारही मृतदेह मच्छीमारांच्या सहाय्याने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत. यावेळी वेंगुर्ला पोलीस तसेच कोस्टगार्ड हेलिकॉप्टर व बोटीद्वारे हे शोधकार्य २३ मे रात्रीपासून सुरू होते. या प्रकरणाचा अधिक तपास वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव करत आहेत.