येत्या ४ दिवसात वेंगुर्लेची संघटना स्थापन : विद्याधर परब

विभागवार दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद
Edited by: दिपेश परब
Published on: January 01, 2026 19:47 PM
views 30  views

वेंगुर्ला : तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी विभागनिहाय पुढील तालुका व शहर संघटना विभागनिहाय प्रमुख पदाधिकारी नेमणूक करून येत्या ४ दिवसात स्थापन करण्यात येणार आहे. आमदार दीपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे पक्षाला बळ देणारी  मजबूत संघटना स्थापन करून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मोठ्या ताकदीने लढल्या जातील. युतीबाबत निर्णय हा वरीष्ठ पातळीवर घेतला जाईल. तूर्तास संघटना मजबुतीवर आम्ही काम केले जाणार असल्याची माहिती आज (१ जानेवारी) शिवसेना वेंगुर्ले पक्ष निरीक्षक तथा जिल्हा बँक संचालक विद्याधर परब यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

वेंगुर्ले सप्तसागर येथील शिवसेना कार्यालयात शिवसेना पक्ष निरीक्षक विद्याधर परब यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, प्रभारी तालुकाप्रमुख सचिन देसाई, जिल्हा संघटक सुनिल डुबळे, नवनिर्वाचित नगरसेविका लीना म्हापणकर, कोचरा सरपंच योगेश तेली, बाळा दळवी, मितेश परब, कौशिक परब, सत्यवान साटेलकर,अमित राऊळ आदी उपस्थित होते. यावेळी सचिन वालावलकर म्हणाले, शिवसेनेचे नेतृत्व करत असताना नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत सावंतवाडी व वेंगुर्ला येथे आमदार दीपक केसरकर व जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवारांना उभे करून पूर्ण ताकतीने लढण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मतदारांनी सुद्धा चांगले मतदान शिवसेनेला केले. आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दृष्टीने नव्याने संघटना बांधणी करून कार्यकर्त्यांना बळ दिले जाणार आहे. संघटनेचे सर्व पदाधिकारी आमदार केसरकर यांच्या मागे ठामपणे असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रभारी तालुकाप्रमुख सचिन देसाई म्हणाले, सर्वप्रथम पक्ष हा मोठा आहे. पक्षांने दिलेली जबाबदारी कार्यकारिणी व संघटना मजबूत करण्यासाठी उद्यापासून तालुकास्तरावर दौरा करणार आहोत. आगामी निवडणुकीच्या आधी मजबूत संघटना उभी केली जाईल. आ. दिपक केसरकर, आ. निलेश राणे यांचे मार्गदर्शन घेऊन पक्ष वाढीसाठी निर्णय घेऊ असे सांगितले.