
सावंतवाडी : शहरात सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या कामासाठी केलेल्या रस्ते खोदाईमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोरडोंगरी-गणेशनगर भागात या अर्धवट बुजवलेल्या खोदाईमुळे एका 'क्रेटा' कारचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या घटनेनंतर स्थानिक नगरसेविका सौ. नीलम परिमल नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेत कंत्राटदाराला फैलावर घेतले.
मोरडोंगरी परिसरात गॅस पाईपलाईनसाठी रस्ता खोदण्यात आला होता. काम झाल्यानंतर रस्ता व्यवस्थित पूर्ववत न केल्याने रस्ता खचला होता. या खचलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने एक कार अपघाताची शिकार झाली. या घटनेची माहिती मिळताच नगरसेविका निलम नाईक यांनी माजी सभापती अॅड. परिमल नाईक आणि स्थानिक रहिवाशांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सौ. नाईक यांनी संबंधित कंत्राटदार, नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने घटनास्थळी बोलावून घेऊन जाब विचारला. "रस्त्यावर रोलर फिरवून तो पूर्ववत केल्याशिवाय शहरात पुढील काम करू देणार नाही," असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच, भविष्यात होणाऱ्या कोणत्याही परिणामास संबंधित यंत्रणाच जबाबदार असेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. गॅस पाईपलाईन टाकताना पाण्याची पाईपलाईन फुटणार नाही याची काळजी घ्यावी, सामान्य नागरिकांना आणि वाहनचालकांना कोणताही उपद्रव होणार नाही, याची दक्षता घ्यावी.खोदलेला रस्ता केवळ मातीने न बुजवता तो रोलर फिरवून पक्का करावा.
या दबावानंतर संबंधित कंत्राटदाराने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समक्ष पुढील दोन दिवसांत रस्ता पूर्ववत करून देण्याची लेखी हमी दिली आहे. यावेळी गणेशनगर आणि मोरडोंगरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










