'लाचलुचपत'च्या जाळ्यात अडकला ; सिंधुदुर्गातील उद्योग निरीक्षक रंगेहाथ सापडला

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 01, 2026 17:16 PM
views 158  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा उद्योग कार्यालयातील उद्योग निरीक्षकाला एका कर्ज प्रकरणात  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.उद्योग निरीक्षक पंकज विठ्ठल शेळके हा ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सिंधुदुर्गच्या विशेष न्यायालयाने त्याला 3 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी ही कारवाई झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ओरोस येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंप परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ०१/२०२६ अन्वये कलम ७अंतर्गत कारवाई करण्यात आली असून दि. १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.१२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी विजय शिवराम पांचाळ (वय ५७), पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग यांनी तक्रार दिली आहे. आरोपी पंकज विठ्ठल शेळके (वय ३२), सध्या रा. जय मल्हार सोसायटी, डॉन बॉस्को शाळेसमोर, कुडाळ, मूळ रा. पलूस कॉलनी, तालुका पलूस, जिल्हा सांगली असा आहे.

आरोपीने आपले लोकसेवक पदाचा गैरवापर करून तक्रारदार स्वप्नील गजानन ठाकूर यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत मंजूर कर्जाच्या ३५ टक्के अनुदान रक्कम मंजूर करून देण्यासाठी एकूण २६ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर २२ हजार रुपये स्वीकारताना आरोपी रंगेहाथ सापडला.

या कारवाईत ५०० रुपयांच्या ४४ नोटा असा एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीस दि. १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.५२ वाजता अटक करण्यात आली असून पुढील तपास अॅन्टी करप्शन ब्युरोमार्फत सुरू आहे.