नववर्षाच्या आरंभी भालचंद्र महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: January 01, 2026 19:56 PM
views 21  views

कणकवली : योगी यांचे योगी प. पू. भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी नववर्षाच्या पहिल्या दिवशी आणि पहिल्या गुरुवारी दर्शनासाठी गर्दी झाली होती. 

२०२५ या सरत्या वर्षाला सिंधुदुर्गवीसांनी बुधवारी निरोप दिला. नववर्षाच्या पहिल्या दिवशी कणकवलीतील प. पू. भालचंद्र महाराज संस्थानातील प. पू. भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी दिसून आली. नववर्षाचा पहिला दिवस अन् पहिला गुरुवार असा योग जुळून आल्याने भालचंद्र महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती. या नववर्षात जीवनात सुख, समाधान, आरोग्य आणि यश लाभो, असे साकडे भालचंद्र महाराज यांच्याकडे भक्तांनी घातले. पहाटे नित्यपूजा झाली.काकड आरतीपासूनच भविकांनी दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. त्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण होते. संस्थान परिसर ‘भालचंद्र महाराज की जय’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. पहाटे काकड आरती, दुपारी आरती त्यानंतर असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री दैनदिन आरती झाली. 

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी असंख्य भक्तांनी आपल्या व्हॉटस्अ‍ॅप स्टेटसवर व सोशल मीडिया प्रोफाइलवर प. पू. भालचंद्र महाराज यांचे फोटो ठेवून श्रद्धेने नववर्षाचे स्वागत केले. नववर्षाच्या पहिल्या दिवशी भालचंद्र महाराजांच्या प्रति असलेली श्रद्धा भक्तांनी व्यक्त केली.