स्वच्छ सुंदर बसस्थानक स्पर्धेत वेंगुर्ले बसस्थानक अव्वल

मुंबई प्रदेश झोन विभागातून प्रथम क्रमांक ; पाच लाखांचे बक्षीस
Edited by: दिपेश परब
Published on: June 27, 2024 14:14 PM
views 217  views

वेंगुर्ले : राज्य परिवहन महामंडळामार्फत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक स्पर्धेचा निकाल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी जाहीर केला आहे. या स्पर्धेत मुंबई प्रदेश झोन विभागातून वेंगुर्ले बस स्थानकाने ७२ गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यासाठी वेंगुर्ले आगार ५ लाख रुपयांच्या बक्षिसास पात्र ठरले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील ३१ जिल्हयातील राज्य परिवहन महामंडळाची आगारे व बसस्थानके यांची नियमित तपासणी व्हावी, प्रवाशांना सेवा व सुविधा मिळतात की नाही याबरोबर आगार व बसस्थानकांत गाड्यांसह परिसराची स्वच्छता रहाते की नाही, याची दरवर्षी पाहाणी व्हावी यादृष्टीने प्रवाशांना सोयीसुविधा देण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळामार्फत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धात्मक स्वरुपात राबविण्यात येत आहे.

या स्पर्धेत सहभागी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ड्यातील १८ बसस्थानकांची तपासणी कोल्हापूर, सांगली व रत्नागिरी विभागाच्या समितीतर्फे झाली होती. या समितीत विभाग नियंत्रक, विभायीग अभियंता, विभागीय उपअभियंता. विभागीय कामगार अधिकारी, सांख्यिकी अधिकारी व स्थानिक प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राधाकृष्ण वेतुरकर, पत्रकार भरत सातोस्कर, प्रवसीमित्र वैभव खानोलकर आदी सदस्यांचा सहभाग होता.