
वेंगुर्ला : वेंगुर्ला–वायंगणी येथील पाच पांडव परिसरात भीषण आग लागली, मात्र या गंभीर प्रसंगी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे अपयशी व बेजबाबदार ठरल्याने वायंगणी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत वायंगणी सरपंच अवि दुतोंडकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
वायंगणी पाच पांडव परिसरात लागलेली आग विझवण्यासाठी आवश्यक असलेला अग्निशमन बंब वेळेत उपलब्ध न झाल्याने प्रशासनाने प्रत्यक्षात हात वर केले. या घटनेची दखल घेण्यासाठी एकही शासकीय कर्मचारी घटनास्थळी उपस्थित राहिला नाही. ही बाब अत्यंत धक्कादायक व निषेधार्ह असल्याच्या भावना ग्रामस्थांतून व्यक्त करण्यात आल्या.
परिणामी ४०–४५ सजग ग्रामस्थांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, आंब्याच्या झाडांवर औषध फवारणीसाठी वापरले जाणारे पंप, वाहनांतील पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी भरून तसेच झाडांच्या फांद्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांचा हा हजरजबाबीपणा प्रशासनाच्या अपयशावर ठळक बोट ठेवणारा आहे. तब्बल १२ तास उलटूनही आग पूर्णतः न विझता ती पुन्हा पुन्हा रौद्र रूप धारण करत होती. त्यामुळे अनेक आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार होते. या घटनेमुळे वायंगणी ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या निष्क्रिय व असंवेदनशील प्रशासना विरोधात कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे. केवळ आश्वासनांवर नव्हे तर ठोस सुविधा, तत्काळ अग्निशमन बंब व जबाबदार यंत्रणा उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.










