
वेंगुर्ले : पावसाळ्याच्या कालावधीत वेंगुर्लेतील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपजिल्हा रुग्णालयातून मिळाव्यात. या दृष्टीने आज शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर व शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन सर्व प्रकारची माहिती घेत आलेल्या प्रत्येक रुग्णाला मोफत औषधासह वैद्यकीय सेवा देण्यात यावी असे स्पष्ट केले त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टरना आदेश दिले आहेत.
वेंगुर्ले येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी सर्वसामान्य नागरिकाकडून शिवसेनेचे पदाधिकारी सचिन वालावलकर उमेश येरम यांच्याकडे आल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील समस्या व सर्वसामान्य वैद्यकीय सुविधा चांगल्या प्रकारे मिळण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता यांची खास बैठक उपजिल्हा रुग्णालयात आयोजित केली होती.
या बैठकिस उपस्थितात जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर, शिवसेनेचे शहर प्रमुख उमेश येरम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप सावंत, डॉ. स्वप्नाली माने-पवार, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंता श्री. केणी, उप अभियंता श्री. भगत, अधिपरिचारीका डिसोझा, व औषध निर्माता (फार्मासिस्ट) यांचा समावेश होता.
या बैठकीत सुरुवातीस उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी असलेली ॲम्बुलन्स शेड वाढविणे ज्या ठिकाणी रुग्णालयात गळती सुरू आहे, तेथील गळती बंद करणे, शवागृहाची इमारत व पिलरला भेगा पडलेल्या आहेत. ते काम बांधकाम खात्याने त्वरीत करावे. एक्स-रे मशीन कॅंडी डिस्पेन्सरीच्या जुन्या इमारतीतून रुग्णालयात हलवणे, आदी कामे सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरीत करावीत. एक्सरे टेक्नीशियन हा मंगळवार व शुक्रवारी आठवड्यातून दोन दिवस असतो. हे रुग्णांना समजण्यासाठी फलक लावावा. हा टेक्नीशियन दररोज उपलब्ध होण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करावा. याचप्रमाणे प्रसुती कक्ष व प्रसुती तज्ज्ञ डॉक्टर असूनही प्रसुती महिलांना बाहेरच्या हाँस्पिटल ला जावे लागते. त्यासाठी आँपरेशनसाठी भुलतज्ज्ञ नसल्याने आँपरेशनची सुविधा नसल्याने महिला याठिकाणी प्रसुतीसाठी दाखल होत नाहीत. रुग्णालयाच्या मागणीनुसार तसा पत्रव्यवहार केला असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली. तसेच कोणी भुलतज्ज्ञ असल्यास आणि तो सेवा देणारा आढळल्यास प्रति आँपरेशन मागे रु. ४ हजार एवढे मानधन त्याने अर्ज सादर केल्यास मिळू शकेल. असेही स्पष्ट केले.
वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात पाच डॉक्टर असूनही डॉक्टरची सेवा सर्वसामान्य रुग्णांना मिळत नाही डॉक्टर जागेवर उपलब्ध नसतात त्यामुळे डॉक्टरांची ड्युटी निश्चित करून रुग्णांना सेवा देण्यात यावे रुग्णालयात तपासणी केलेल्या रुग्णांना डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाप्रमाणे पूर्ण औषधे फार्मासिस्ट कडून दिली जात नाहीत. याचे कारण विचारले असता त्यावेळी औषध साठा कमी उपलब्ध असल्याने दहा दिवसानंतर पुन्हा औषधे घेण्यासाठी बोलावण्यात आल्याचे औषध निर्मात्या (फार्मासिस्ट) कडून सांगण्यात आले. यावेळी सचिन वालावलकर यांनी रुग्णालयास अत्यावश्यक औषधांचा साठा मिळतो का? या प्रश्नावर औषधे सर्व प्रकारची मिळतात असे स्पष्टीकरण रुग्णालयाकडून देण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी प्रत्येक डॉक्टरांची ड्युटी व त्यांचे नाव निश्चित करून सेवा दिली जावी. रुग्णांना प्रत्येक वेळी रुग्णालयातील ड्युटीवरील डॉक्टर सेवा देण्यास सज्ज असलाच पाहिजे. डुटी करण्याऱ्या डॉक्टरचे नाव व डुटीची वेळ असा फलक तपासणीस आलेल्या रुग्ण व नातेवाईक यांच्या माहितीसाठी डॉक्टर रुम ठिकाणी लावावा. असे आदेश रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संदीप सावंत यांना दिले आहेत. तसेच रुग्णालयातील कुठल्याही कर्मचाऱ्याकडून चालढकलपणा, हलगर्जीपणा बेजबाबदार पणाची वागणूक रुग्णांना दिले जात असेल तर अशा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी उमेश येरम यांनी केली असता आतापासून अशी कारवाई केली जाईल अशी आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिले.
रुग्णालयातील रुग्णांना पिण्याचे पाणी बाबत सचिन वालावलकर यांनी विचारणा केली असता सध्या पिण्याचे पाण्यासाठी असलेले दोन्ही कुलरमध्ये बिघाड झाल्याने बंद पडल्याची माहिती देत ते दुरुस्त करूनही योग्यरित्या सेवेस उपलब्ध होऊ शकणार नाहीत. यावर सचिन वालावलकर यांनी नवीन मोठा स्टीलचा कुलर आपण शालेय शिक्षण मंत्री यांच्या माध्यमातून निधीद्वारे उपलब्ध करून लवकरच देण्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडे स्पष्ट केले, मात्र त्याची निगा हॉस्पिटल प्रशासनाने राखावयाची आहे असेही स्पष्ट केले.