
वेंगुर्ला : तालुका क्रिडा संकुल येथे अद्यावत सुविधा निर्माण करणे यात ४०० मीटर सिंथेटीक धावण मार्ग व फुटबॉल मैदान, प्रेक्षक गॅलरीसहित बैठक व्यवस्था करणे या कामासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांच्या मागणीनुसार सुमारे १२ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात यावा असे निवेदन शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांना दिले होते. यानुसार या कामाची तात्काळ मंजुरीबाबत कार्यवाही करण्यात यावी असे आदेश क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत.
वेंगुर्ला तालुका क्रीडा संकुल येथे अद्यावत सुविधा निर्माण करणे यात ४०० मीटर सिंथेटीक धावण मार्ग व फुटबॉल मैदान, बैठक व्यवस्था कारण्याकरिता निधी मंजूर करुन मिळणेबाबत सचिन वालावलकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन दिले होते. यात त्यांनी म्हटले होते की, तालुका क्रिडा संकुल वेंगुर्ला करिता ११.८६ एकर एवढी जागा प्राप्त असून आपल्या प्रयत्नातून या क्रीडा संकुलाकरीता दिनांक ०४ एप्रिल २०१६ रोजीच्या प्रशासकीय मान्यतेने रु. १ कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यातून याठिकाणी भव्य अशी प्रशासकीय इमारत, बहुउद्देशीय हॉल, ४०० मीटर धावण मार्ग, विविध खेळाची मैदाने इत्यादी सुविधा पूर्ण झालेल्या आहेत. या क्रिडा संकुलातून या भागातील खेळाडू व नागरीक त्याचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. दरम्यान अजूनही या तालुका क्रिडा संकुलामध्ये ४०० मीटर सिंथेटीक धावण मार्ग, फुटबॉल मैदान बैठक व्यवस्थेसह आंतरराष्ट्रीय दर्जाची अद्यावत सुविधा निर्माण झाल्यास त्याचा लाभ वेंगुर्ला तालुक्यातील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना होईल. तसेच या क्रिडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धाही घेता येणार असून त्याद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होण्यासही मदत होणार आहे. तरी या कामासाठी निधी मंजूर करुन मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती.
यानुसार या कामासाठी सुमारे १२ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात यावा असे निवेदन शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांना दिले होते. दरम्यान या कामाच्या तात्काळ मंजुरीबाबत कार्यवाही करण्यात यावी असे आदेश क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत. यामुळे आता वेंगुर्ला स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा पुढील काळात उपलब्ध होणार असुन याचा मोठा फायदा वेंगुर्ला तालुक्यासहित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना होणार आहे.