वेंगुर्ल्यात पावसाची जोरदार हजेरी !

Edited by: दिपेश परब
Published on: May 22, 2024 13:15 PM
views 181  views

वेंगुर्ला : विजांचा गडगडाट आणि वादळीवाऱ्यांसह मान्सुनपुर्व पावसाने आज (२२ मे) वेंगुर्ला तालुक्यात जोरदार हजेरी लावली. सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. यामुळे सर्व ठिकाणी पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली होती. वादळी वा-यामुळे विज पुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत खंडित झाला होता. 

  तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन मान्सुनपुर्व पावसाची रिपरिप सुरूच आहे. मात्र मंगळवारी २१मे रोजी रात्री ९ नंतर व आज बुधवारी सायंकाळी ५ नंतर जोरदार अवकाळी पावसाने विजांच्या गडगडाटा सहित हजेरी लावली. आज दुपारपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन विजांचा गडगडाट सुरू झाला, त्यानंतर वादळीवाऱ्यांसह जोरदार पावसाला सुरूवात झाली. वेंगुर्ला तालुक्यात अर्धा तास पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. वाऱ्याचा वेग देखील वाढला होता.सायकांळी उशिरापर्यत तालुक्याच्या अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत होत्या.विजांच्या लखलखाटामुळे तालुक्याच्या अनेक भागातील विजपुरवठा खंडित झाला. 

    तालुक्यातील पेंडुर येथील कृष्णा गोविंद काळोजी यांच्या घरांवर व शौचालयावर मंगळवारी २१ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जोरदार विजांसहित झालेल्या पावसामुळे विज पडून मिटर, वायरिंग, फॅन, घरातील सर्व लाईट बोर्ड, मिक्सर तसेच एक दगडी भिंत भेगा पडून सुमारे १ लाख ५० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती तलाठी किरण गजनीकर यांनी दिली आहे.