वेंगुर्ला : पाणथळ क्षेत्रे ही जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. ही परिसंस्था जलसंधारण, हवामान संतुलन आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे आपली जबाबदारी आहे. पाणथळ प्रदेशातील जैवविविधतेचा अभ्यास करून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. याबाबत कार्यशाळा नागरिकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक दृष्टिकोन निर्माण करण्यास मदत करतात. वेंगुर्ले नगरपरिषद भविष्यातही अशा प्रकारच्या उपक्रमांना पाठिंबा देत राहील व पाणथळ क्षेत्रांचे संवर्धन करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले.
वेंगुर्ला नगरपरिषद, वनशक्ती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, कांदळवन कक्ष मालवण आणि महाराष्ट्र वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पाणथळ भूमी दिनानिमित्त दिनांक २ व ३ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘आपल्या समृद्ध भविष्यासाठी पाणथळ प्रदेशाचे संरक्षण करणे’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन २ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ व बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य एम.बी.चौगुले यांच्या हस्ते जलकलश पूजन करून करण्यात आले. उद्घाटनानंतर प्रितीश लाड यांनी पारंपरिक गाऱ्हाणे घातले. यानंतर उपस्थित सर्व सहभागी सदस्यांनी जल शपथ घेतली यावेळी भूगर्भशास्त्रज्ञ अनिलराज जगदळे, पाणथळ जागा तज्ञ डॉ. नागेश दप्तरदार, पाणथळ संशोधक व पक्षी तज्ञ प्रवीण सावंत, बॅ खर्डेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. धनश्री पाटील, करिष्मा मोहिते, कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले नागरिक व विद्यार्थी (उद्यानविदया महाविद्यालय मुळदे, वेतोरे हायस्कुल, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय) तसेच वेंगुर्ला नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यानंतर कार्यशाळेत सहभागी सदस्यांनी आंबेखण पाणथळ भूमीला भेट देऊन तेथील जैवविविधतेचा अभ्यास केला. विशेषतः विविध पक्षीप्रजातींचे निरीक्षण व मार्गदर्शन करण्यात आले. या भागात आढळणाऱ्या पक्ष्यांमध्ये जांभळा बगळा, खंड्या, टिटवी, वेडा राघू, ढोकरी, बगळा, पाकोळी, स्विफ्टलेट आणि मोठा पाणकावळा यांचा समावेश होता. तसेच, पाणथळ क्षेत्रे ही पक्ष्यांसाठी महत्त्वाची अधिवास स्थाने असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. पाणथळ वनस्पतींचे महत्त्व आणि त्यांचे पर्यावरणीय योगदान याविषयी सखोल माहिती देण्यात आली. यानंतर कार्यशाळेच्या क्षेत्रभेटी अंतर्गत निशाण तलाव, पाट तलाव, वालावल पाणथळ भूमी आणि धामापूर पाणथळ भूमी यांना भेट देण्यात आली. या ठिकाणी आढळणाऱ्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यात आला आणि त्यांचे पर्यावरणीय महत्त्व स्पष्ट करण्यात आले.
पाणथळ प्रदेश हे जलचक्रासाठी, पर्यावरणीय संतुलनासाठी, आणि विविध जैवविविधतेला आधार देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. प्लास्टिक प्रदूषणामुळे होणारे विपरीत परिणाम जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी स्वच्छता देखील करण्यात आली. सहभागी सदस्यांनी आपले योगदान दिले आणि पाणथळ क्षेत्रांना प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. त्यानंतर विविध पर्यावरणीय खेळांचे आयोजन करण्यात आले.
ही कार्यशाळा पाणथळ क्षेत्रांचे संवर्धन आणि जैवविविधतेचे संरक्षण याविषयी जनजागृती करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे, ज्यामुळे भविष्यात या परिसराचे संरक्षण करणे आणि पर्यावरणीय संतुलन राखणे शक्य होईल. कार्यशाळेच्या शेवटी विद्यार्थ्यांनी "वेटलॅन्ड वॉरिअर्स" म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली आणि आपल्या अनुभवांविषयी भरभरून प्रतिक्रिया दिल्या. त्यांनी पाणथळ जागांचे पर्यावरणीय महत्त्व समजून घेतल्याचे सांगितले आणि त्यांच्या संवर्धनासाठी पुढेही प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.