जर्मनी - आफ्रिकेतील शिष्‍टमंडळाकडून वेंगुर्ला नगरपरिषदेच्या प्रकल्पांचे कौतुक

वेंगुर्ला न.प.च्‍या स्‍वच्‍छ भारत पर्यटन स्थळाला भेट देऊन केली पाहणी
Edited by: दिपेश परब
Published on: April 16, 2024 09:57 AM
views 170  views

वेंगुर्ले : जर्मनी व आफ्रिका या देशांमधील १५ सदस्‍यीय शिष्‍टमंडळाने वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या स्‍वच्‍छ भारत स्‍थळ (कंपोष्‍ट डेपो) येथील विविध प्रकल्पांना भेट दिली. पारंपारिक कोकणी पद्धतीने शिष्टमंडळाचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी स्वागत केले व स्वच्‍छता कर्मचा-यांनी बनविलेल्या नैसर्गिक कोकोडेमा भेट देण्‍यात आला. त्‍याचप्रमाणे या ठिकाणी त्‍यांनी कोकणी मेव्‍याचा आस्वाद घेतला. तत्त्वज्ञान, विज्ञान यांच्या एकत्रित वापरातून व शाश्‍वत कामातून लोककल्याणासाठी राबविलेला एक उत्कृष्ट प्रकल्प आहे. वेंगुर्ला नगरपरिषद ही जगभरातील शहरांसाठी रोल मॉडेल असून इतर शहरांनी वेंगुर्ला पॅटर्न राबवून आपली शहरे स्वच्‍छ व सुंदर करुन राष्ट्रीय आणि जागतिक उद्दिष्टे साध्य करावीत. असे मत या शिष्टमंडळाने भेटी नंतर व्यक्त केले. तसेच वेंगुर्ले नगरपरिषदेच्या स्वच्छतेविषयी उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

जी आय झेड ही जर्मनी सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी चालवली जाणारी संस्था आहे. या संस्‍थेच्‍या प्रो साॅईल प्रकल्‍पासोबत महाराष्‍ट्र राज्‍यात विविध उपक्रम राबविण्‍यात येत असून Urban – Rural Nutrient & Carbon Cycle (URNCC) या संकल्‍पनेअंतर्गत हरित – महासिटी कंपोष्‍ट हा उपक्रम राबविण्‍यात येतात. स्वच्छ महाराष्‍ट्र अभियान (नागरी) अंतर्गत घनकचरा व्‍यवस्‍थापनाद्वारे शहरे स्वच्‍छ करणे हे महत्‍वाचे उद्दीष्‍ट आहे. याचाच एक भाग म्हणून जी आय झेड या संस्‍थेमार्फत कंपोष्‍टींग या विषयात सहकार्य केले जाते. या संस्‍थेतर्फे एप्रिल महिन्‍यात Knowledge Exchange Workshop ही आंतरराष्‍ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्‍यात येते. त्यामुळेच ही भेट या शिष्टमंडळाने दिली.

वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांनी या शिष्‍टमंडळाला स्वच्‍छता विषयक विविध बाबींची माहिती दिली. शिष्‍टमंडळातील सदस्‍यांनी संवाद साधताना विविध प्रश्न केले जसे की, वेंगुर्ला नगरपरिषद कशाप्रकारे वर्गीकृत कचरा संकलित करते व त्‍याची देखरेख कोणाकडून केली जाते? मिश्र कचरा देणा-या नागरीकांवर कोणत्‍या स्वरुपात कारवाई केली जाते ? या प्रकल्‍पाची उभारणी करण्‍यासाठी निधीची तरतूद कशी करण्‍यात आली व तो प्रकल्‍प सक्षमपणे चालविण्‍यासाठी भविष्‍यातील नियोजन कसे आहे? कच-या पासून उत्‍पन्न मिळविण्‍याचे मार्ग? नगरपरिषदेद्वारे तयार करण्‍यात आलेल्या कंपोष्‍ट खताचा उपयोग व त्‍याचा उत्‍पन्न वाढीसाठी काय फायदा होतो ? या प्रश्‍नांद्वारे शेतक-याशी सुद्धा थेट संवाद साधला.


या चर्चेदरम्‍यान रासायनिक खताच्या वापरामुळे जमीनीची सुपिकता कमी होत असल्‍याचे निदर्शनास आले व काही कालावधीनंतर वेंगुर्ला नगरपरिषदेने निमिर्ती केलेल्‍या हरित कंपोष्‍ट खताचा वापर केल्यानंतर त्‍याचा पिकांवर चांगला परिणाम होत असल्‍याचे दिसून आले व पूर्वीच्या तुलनेत उत्‍पन्नात वाढ झालेबाबत आंबा बागायतदार श्री.नार्वेकर यांनी शिष्टमंडळास सांगितले. घनकचरा व्‍यवस्‍थापन प्रकल्‍पाची उभारणी, दैनंदिन देखभाल दुरुस्ती, प्रकल्‍प उत्‍पन्न व खर्च, कंपोष्‍ट खताचे प्रमाणीकरण, प्रकल्‍पाची शेतकरी व बागायतदार यांच्यासोबत संलग्नता या बाबींवर सविस्तर ‍मार्गदर्शन व विविध शंकांचे निरसन मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले. त्यांनतर शिष्‍टमंडळाने वेंगुर्ला बायोगॅस प्रकल्‍प, सांडपाणी व मैलापाणी व्‍यवस्‍थापन प्रकल्‍प व घंटागाडीमधील विविध प्रकारांत वर्गीकृत केलेल्‍या कच-याची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या स्‍वच्‍छ भारत पर्यटन स्‍थळ (कंपोस्‍ट डेपो) येथील Waste to Best संकल्‍पनेनूसार विकसित करण्यात आलेल्‍या Miracle Park या ठिकाणांना भेट दिली. या शिष्‍टमंडळाने आपल्या संदेशात म्हटले आहे की माहिती, तत्त्वज्ञान, विज्ञान यांच्या एकत्रित वापरातून व शाश्‍वत कामातून लोक कल्याणासाठी राबविलेला एक उत्कृष्ट प्रकल्प. वेंगुर्ला नगरपरिषद ही जगभरातील शहरांसाठी रोल मॉडेल असून इतर शहरांनी वेंगुर्ला पॅटर्न राबवून आपली शहरे स्वच्‍छ व सुंदर करुन राष्ट्रीय आणि जागतिक उद्दिष्टे साध्य करावीत. या शिष्टमंडळात अॅड्रीयन जॅफी, रफिका जमाल, अॅडेल लॅबेन, जीन मार्क, मार्टीन ओवलू, मिलड्रेड जेट्रुड, जितेंद्र यादव, ताप्‍ती मिश्रा व मलाया कुमार मिश्रा व इतर सदस्‍यांचा समावेश होता.

यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, परिविक्षाधीन मुख्‍याधिकारी प्रतिक थोरात, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, स्वच्‍छ महाराष्‍ट्र जिल्हा समन्‍वयक निखील नाईक, शहर समन्‍वयक पूर्वा मसुरकर उपस्थित होते.GIZ शिष्टमंडळ भेटीचे संपूर्ण नियोजनकरिता पर्यवेक्षक जयेंद्र चौधरी, स्वच्‍छता मुकादम संतोष जाधव व नगरपरिषद स्वच्‍छता कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.