सर्वांनी एकत्रित काम केल्याने वेंगुर्ला नगरपरिषद अव्वल : संजय पडते

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान
Edited by: दिपेश परब
Published on: April 26, 2023 20:50 PM
views 226  views

वेंगुर्ला :

आज संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छतेबाबत वेंगुर्ला नगरपरिषदेचा आदर्श घेतला जात आहे. हे सर्व श्रेय मागील १५ वर्षातील सर्व मुख्याधिकारी, अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर नागरिकांचे आहे. कर्मचारी हा दिवसरात्र मेहनत करतो आणि त्याच हे फळ मिळत असत. पूर्वीप्रमाणेच आता सुद्धा पुन्हा पर्यटक वेंगुर्ल्याकडे वाळू लागले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भरगोस निधी हा नगरोत्थान मधून वेंगुर्ल्याला दिला गेला. आणि सर्वांच्याच एकत्रित काम केल्यामुळे नगरपरिषदेला हे यश मिळू शकले असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी वेंगुर्ले येथे केले. 

     वेंगुर्ला नगरपरिषदेने शहर सौंदर्यीकरण व शहर स्वछता स्पर्धा २०२२ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, कार्यालयीन अधीक्षक संगीता कुबल यांच्यासाहित कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व ८८ स्वच्छता कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी परितोष कंकाळ, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, वेंगुर्ला तालुका संपर्कप्रमुख भालचंद्र चिपकर, तालुकाप्रमुख यशवंत परब, शहरप्रमुख अजित राऊळ, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, माजी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, माजी नगरसेवक तुषार सापळे, सुमन निकम, न.प. कार्यालयीन अधीक्षक संगीता कुबल, अणसुर माजी उपसरपंच संजय गावडे, आर्किटेक्ट अमित कामत आदी उपस्थित होते. 

   यावेळी बोलताना मुख्याधिकारी परितोष कंकाळ म्हणाले की, या यशात नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांचा मोठा वाटा आहे. हा दर्जा टिकवून ठेवणे व उत्तरोत्तर अजून प्रगती करणे हे आपल्यासमोर आव्हान आहे. शहराच्या सौंदर्यामध्ये, स्वच्छतेमध्ये सातत्य टिकवून ठेवण्यासाठी व यातुन रोजगाराच्या पर्यटनाच्या संधी कशाप्रकारे निर्माण करता येतील हे उद्दिष्ट ठेऊन पुढचा प्रवास करणार आहोत. आणि यात वेंगुर्ल्यातील नागरिक, सर्व लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढचा प्रवास करायचा असल्याचेही मुख्याधिकारी श्री कंकाळ यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाप्रमुख यशवंत परब तर आभार प्रदर्शन शहरप्रमुख अजित राऊळ यांनी केले.