
वेंगुर्ला : युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या "मॉक ड्रिल" म्हणजेच संकटकालीन बचाव प्रशिक्षण वेंगुर्ल्यातही घेण्यात आले. यावेळी शासनाच्या आदेशानुसार वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत वाजविण्यात आलेल्या सायरननंतर बाजारपेठ परिसर निमर्नुष्य झालेला पहायला मिळाला. पोलिसांनी व प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना केल्या.
जम्मू काश्मिरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार करता, खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीत संकटकालीन बचाव प्रशिक्षण (मॉक ड्रील) घेण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रातील १६ ठिकाणांचा यात समावेश होता. या १६ ठिकाणांमध्ये सिधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश असल्याने आज संपूर्ण जिल्ह्यात दुपारी ४ वाजता मॉक ड्रिल घेण्यात आले. यावेळी वेंगुर्ला शहरातही या मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. दुपारी ४ वाजता आवाज वरखाली होणारा भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क करण्यात आले. यावेळी पोलिस, नगरपालिका प्रशासन यांच्यामार्फत संपूर्ण बाजारपेठ निमर्नुष्य करून नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, रूग्णवाहिका सज्ज होत्या. बाजारपेठेत पोलिस निरीक्षक संदिप भोसले, मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांच्यासहीत अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनीही या मॉकड्रिलला प्रतिसाद दिला.