वेंगुर्ल्यात उद्या विविध ग्रामदैवता येणार समुद्रस्नानासाठी

महोदव पर्वणीचे निमित्त !
Edited by: दिपेश परब
Published on: February 08, 2024 12:56 PM
views 301  views

वेंगुर्ला :  पौष अमावास्येला होणा-या महोदय पर्वणीचे औचित्य साधून विविध गावचे ग्रामदैवत आणि तरंगदेवता वेंगुर्ला सागरेश्वर तिर्थक्षेत्रावर स्नानासाठी येणार आहेत. यावेळी हजारो भाविक आपल्या देवतांसह हे तिर्थस्नान करणार असून वेंगुर्ला सागरेश्वर किनाऱ्यासहित आरवली समुद्र किनाऱ्यावर अलोट गर्दी पाहायला मिळणार आहे. या महोदय पर्वणीमुळे तालुक्यात सर्वत्र चैतन्याचे वातावरण पहायला मिळत आहे. 


      पौष अमावास्या व श्रवण नक्षत्र एकत्र आल्यास महोदय पर्वणीचा योग येतो. यावर्षी असा योग आल्याने ९ फेब्रुवारी रोजी गावोगावच्या ग्रामदैवतांसह भाविक तीर्थस्नान करणार आहेत. महोदय पर्व सकाळी ८ वाजून २ मिनिटपासून ते सूर्यास्तापर्यंत असल्याने या कालावधीत तीर्थस्नान करता येणार आहे. यापूर्वी ८ फेब्रुवारी २०१६ त्यानंतर ४ फेब्रुवारी २०१९ साली महोदय पर्वणीचा योग आला होता. वेंगुर्ला तालुक्यातील श्री तीर्थक्षेत्र सागरेश्वर व आरवली समुद्रकिनारी पंचक्रोशीतील देवस्थाने तरंगदेवता व पालख्यांसह तीर्थस्नानासाठी येत असतात.


      तीर्थस्नानाला येण्यापूर्वी त्या त्या गावातील मानकरी, गावकर मंडळी, देवस्थान विश्वस्त आपल्या ग्रामदेवतेचा कौलप्रसाद घेतात. जर हा कौलप्रसाद झाला, तरच भक्तमंडळी आपल्या ग्रामदेवतेसह तीर्थस्नानास येतात. यावर्षी मिळालेल्या कौलप्रसादानुसार वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, श्री देवी सातेरी, श्री देव पूर्वस व तरंगदेवता तीर्थस्नानासाठी जाणार आहेत. तसेच आंबडपाल, मांडकुली, वाडोस, बांबुळी, पुळास आदी ठिकाणची ग्रामदैवत आपल्या भक्तांसमवेत तिर्थस्नानासाठी येणार आहेत. त्यामुळे शुक्रवारी वेंगुर्ला शहर व सागरेश्वर परिसरात विविध ठिकाणच्या ग्रामदैवतांचे दर्शन घडणार असल्याने भाविकही मोठ्या प्रमाणावर दाखल होणार आहेत. काही ठिकाणी मुंबई, पुणेस्थित चाकरमानही या तिर्थस्थानासाठी येणार आहेत.