सावंतवाडीत २५ जानेवारी रोजी 'वैश्यवाडा प्रिमीयर लिग'

Edited by: विनायक गांवस
Published on: January 24, 2026 16:34 PM
views 26  views

सावंतवाडी : सावंतवाडी, वैश्यवाडा कला क्रिडा मंडळ आयोजित वैश्यवाडा प्रिमीयर लिगचे आयोजन करण्यात आले असून २५ जानेवारी रोजी तनुष स्पोर्ट्स क्लब (टर्फ), निरुखे कोलगांव येथे ही स्पर्धा होणार आहे.

या वैश्यवाडा प्रिमीयर लिगचे हे पहिले सत्र असून या स्पर्धेतील विजेत्याला नेवगी परिवाराकडून कै. राकेश नेवगी स्मृती प्रित्यर्थ रोख १००२६ रुपयांचे पारितोषिक व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला नगरसेविका सौ. मोहिनी मडगांवकर यांचेकडून ७०२६ चे रोख पारितोषिक व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तसेच मालिकावीर व सामनावीरसाठी नगरसेविका सौ. निलम परिमल नाईक पुरस्कृत पारितोषिक देण्यात आलेले आहे.

उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज व क्षेत्ररक्षक यांचेसाठी वैश्यवाडा हनुमान मंदिर उत्सव समिती कडून पारितोषीक ठेवण्यात आलेली आहेत.या प्रिमीयर लिगमध्ये वैभव म्हापसेकर यांचा युनायटेड डेवील्स, दीपक म्हापसेकर व बंड्या सुकी यांचा बीडी वारिअर्स, वैशाख मिशाळ यांचा गोल्ड फिश इलेव्हन, धिरज व गजानन सुकी यांचा एन.व्ही. बॉय्ज, धिरेंद्र म्हापसेकर यांचा श्रील वारिअर्स व राहूल व अंकीता नेवगी यांचा फियरलेस फायटर्स असे सहा संघ सहभागी आहेत.

वैश्यवाडा प्रिमीयरलिग साठी खेळाडूची लिलाव प्रक्रिया नुकतीच वैश्यवाडा श्री हनुमान मंदिर येथे मोठ्या चढाओढीत संपन्न झाली. त्याचवेळी माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी, सौ. मनिषा मिशाळ, अरुण म्हापसेकर, आनंद म्हापसेकर, सौ. अस्मिता नेवगी, मिलींद सुकी, महेश म्हापसेकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रिमीयर लिगच्या चषकांचे अनावरण करण्यात आले.