
कुडाळ : "मी स्वतः स्थानिक आहे आणि यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मतदारसंघात अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. नेरूर गावातील प्रत्येक संकटात मी ग्रामस्थांच्या पाठीशी उभा राहिलो आहे. त्यामुळे नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून माझाच विजय निश्चित आहे," असा ठाम विश्वास शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार संजय पडते यांनी व्यक्त केला.
कुडाळ तालुक्यातील नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पडते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या जमेच्या बाजू मांडतानाच विरोधकांवरही, विशेषतः रुपेश पावसकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
संजय पडते म्हणाले की, "शिवसेना-भाजप युतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला नेरूर मतदारसंघातून संधी मिळाली आहे. यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना या भागात मी मोठी विकासकामे केली आहेत. मी स्वतः याच मातीतील, स्थानिक कार्यकर्ता आहे. त्यामुळे लोकांची नाळ माझ्याशी जुळलेली आहे. पूर्वी देखील नेरूरकरांनी मला भरभरून सहकार्य केले आहे आणि यावेळीही ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील."
"माझ्या हाताखाली मी असंख्य कार्यकर्त्यांना मोठे केले आहे. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांमध्ये माझे अत्यंत चांगले संबंध आहेत. जेव्हा जेव्हा नेरूर गावामध्ये संकट आले, तेव्हा तेव्हा मी धावून गेलो आहे. त्यामुळे जनता आणि कार्यकर्ते मला अंतर देणार नाहीत," असेही पडते यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना संजय पडते यांनी रुपेश पावसकर यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, "गुरु आणि शिष्याची उपमा देणाऱ्यांनाच विचारा की तुम्ही कुठे होतात आणि आता कुठे गेलात?" असा खोचक सवाल करत त्यांनी पावसकरांवर निशाणा साधला.
स्थानिक उमेदवार आणि दांडगा जनसंपर्क या त्रिसूत्रीवर आपण ही निवडणूक जिंकणारच, असा आत्मविश्वास संजय पडते यांनी व्यक्त केला आहे.










