
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात सुवासिनींनी वटपौर्णिमा पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी केली. परिसरात वडाच्या झाडाच्या ठिकाणी महिलांनी पूजेसाठी गर्दी केली होती.
वटपौर्णिमेला विवाहित महिला वटवृक्षाच्या मुळाशी पाणी शिंपून बुंध्याला सुताचे फेरे घालतात. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. या परंपरेप्रमाणे वटवृक्ष असलेल्या ठिकाणी वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. वडाचे झाड दीर्घायुषी असते. त्याप्रमाणे आपला पतीही दीर्घायुषी राहावा तसेच पती-पत्नीमधील मधुर नाते आणखी दृढ करण्यासाठी प्रत्येक सुवासिनीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची मनोभावाने पूजा करते. सकाळपासूनच सुहासिनीमध्ये पूजेची लगबग सुरू होती. साजशृंगार करून हातामध्ये पूजेचे ताट घेऊन परिसरातील वडाच्या झाडाला सात फेर्या घेऊन वडाच्या झाडाची मनापासून पूजा केली. त्यानंतर वडाच्या झाडाला पुरणपोळीचा नैवद्य दाखवून दर्शन घेतले. शहरातील वटसावित्री मंदिरात देखील मोठा उत्साह पहायला मिळाला. पूजेनंतर सुवासिनींनी एकमेकींना वाण दिले. या निमित्ताने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.