
सावंतवाडी : एलआयसी ऑफ इंडिया व आयआरडीएचे विविध प्रस्ताव मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी कुडाळ लियाफी संघटनेच्या वतीने सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांना शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी लेखी निवेदन लियाफी संघटना, कुडाळ शाखेचे अध्यक्ष संजय पिळणकर, सचिव चंद्रकांत घाटे, सहसचिव रामकृष्ण मुंज, डिव्हिजन कौन्सिलचे सदस्य दिलीप सांगावकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी एलआयसी विरोधी आयआरडीएचे अन्यायकारक प्रस्ताव मागे घेण्यात यावेत, अशी मागणी ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने संपूर्ण देशात आज शुक्रवार दि.११ नोव्हेंबर २०२२ रोजी देशातील प्रत्येक जिल्ह्यात एलआयसीच्या सर्व शाखांच्या लियाफी संघटनेच्या वतीने त्या - त्या शाखेजवळील जिल्हाधिकारी / प्रांताधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे एलआयसीच्या पॉलिसीधारकांचा बोनस वाढला पाहिजे, पॉलिसीवर मिळणाऱ्या कर्जाचे व्याजदर कमी करणे, पॉलिसीचा हप्ता भरण्यास उशीर झाल्यास आकारण्यात येणाऱ्या लेटफीचे दर कमी करणे, विमा हप्त्यावरील आकारण्यात येणारा भरमसाट जीएसटी मागे घेण्यात यावा, विमा प्रतिनिधींच्या ग्रॅच्युईटीमध्ये वाढ करणे, विमा प्रतिनिधींसाठी वेलफेअर फंड तयार करणे, विमा प्रतिनिधींना टर्म इन्शुरन्स वाढवून देण्यात यावा, सर्व विमा प्रतिनिधींना मेडिक्लेमचा फायदा मिळावा, आदी रास्त मागण्या करण्यात आल्या आहेत.