३१ मार्चला हडपीड स्वामी समर्थ मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन

Edited by:
Published on: March 21, 2025 17:10 PM
views 135  views

देवगड : देवगड तालुक्यातील हडपिड येथे ३१ मार्चला स्वामी समर्थ प्रकटदिनाचे औचित्य तसेच हडपीड श्री स्वामी समर्थ मठाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त कलर्स वाहिनी वरील मराठी फेम श्री स्वामी समर्थ मालिकेतील कलावंत अक्षय मुडावदकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड या मठाचा सहावा वर्धापन दिन सोहळा, तसेच अक्कलकोट निवास श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त ३० व ३१ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिनांक ३१ मार्च रोजी पुणे जेजुरी गड कडेपठारावरील श्री देव मल्हारी मार्तंड यांच्या येळकोट येळकोट जय मल्हार देखाव्याचे उद्घाटन श्री स्वामी समर्थ मालिका फेम श्री स्वामींची भूमिका साकारलेले अभिनेते श्री अक्षय मुडावदकर यांच्या हस्ते सकाळी ९:३० वाजता होणार आहे. यानिमित्त होणारे कार्यक्रम रविवार ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता शिरगाव पावणादेवी मंदिर ते श्री स्वामी समर्थ मठ हडपिड पर्यंत पालखी मिरवणूक, सायंकाळी ७ वाजता पुणे जेजुरी गड, कडेपटारावरील श्री देव मल्हारी मार्तंड यांच्या सत्वांचे आगमन.

सोमवार ३१ मार्च रोजी सकाळी सकाळी ५ ते ९ वाजता या कालावधीत श्री गणेश पूजन, पादुकापूजन,अभिषेक,होमहवन,श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी ९:३० वाजता मल्हारी मार्तंड यांच्या देखाव्याचे अक्षय मुडावदकर यांच्या हस्ते उद्घाटन, सकाळी १० वाजता लघुरुद्र कुंकूमार्चन,दुपारी १२ वाजता पालखी प्रदक्षिणा सोहळा, दुपारी १२:३० वाजता महाआरती,दुपारी १ ते २:३० महाप्रसाद,सायंकाळी ४ वाजता गोंधळ, सायंकाळी ६ वाजता सुस्वर भजने, सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत महाप्रसाद, रात्री १० वाजता तुफानी विनोदी लोकनाट्य कोकणचा साज संगमेश्वरी बाज आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडच्या वतीने संस्थापक अध्यक्ष  प्रभाकर राणे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर व विश्वस्त खजिनदार ज्ञानेश्वर राऊत यांनी केले आहे.