
कणकवली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कणकवली येथील हर्णेआळीमध्ये सुदर्शन महिला मंडळातर्फे रविवार ८ मार्च रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमधून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याबरोबरच समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सायंकाळी ४.३० वाजता शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार असून या रॅलीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे. तसेच कर्तृत्ववान एकल माता पालकांचा सन्मान करून त्यांच्या संघर्षमय प्रवासाला सलाम केला जाणार आहे. याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत मुलींचाही सत्कार करण्यात येणार आहे.
तरी हर्णे आळी व तेलीआळी परिसरातील महिलांसाठी मनोरंजनात्मक उपक्रम म्हणून खेळ पैठणीचा हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांमुळे महिला दिन अधिक उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सुदर्शन महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.











