
कुडाळ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री-शक्तीचा जागर करण्यासाठी कुडाळ शहरातील स्थानिक कापड व्यावसायिकांच्या वतीने रविवार, ८ मार्च २०२६ रोजी विशेष 'साडी वॉकेथॉन-२०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपाचा उपक्रम राबवला जात असून, महिलांमध्ये याबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
ही वॉकेथॉन केवळ महिलांसाठी असून सहभागी महिलांना पारंपारिक साडी परिधान करून चालावे लागणार आहे.
वेळ: रविवार सकाळी ७:०० वाजता (रिपोर्टिंग वेळ: सकाळी ६:३० वा.)
स्थळ: महालक्ष्मी सभागृह, कुडाळ (प्रारंभ आणि सांगता)
गट: १.५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर.
असे असतील वॉकेथॉनचे मार्ग
१. १.५ कि.मी. मार्ग: महालक्ष्मी सभागृह - भैरव मंदिर - बस स्थानक - बाजारपेठ - वर्दम तिठा - पान बाजार - महालक्ष्मी सभागृह.
२. ३ कि.मी. मार्ग: महालक्ष्मी सभागृह - भैरव मंदिर - बस स्थानक - नक्षत्र टॉवर - जिजामाता चौक - पोस्ट कार्यालय - पोलीस ठाणे - छत्रपती संभाजी महाराज चौक आणि पुन्हा त्याच मार्गे बाजारपेठमार्गे महालक्ष्मी सभागृह.
सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला पदक, भेटवस्तू, सरप्राईज कूपन आणि अल्पोपहार दिला जाणार आहे. तसेच, सर्वात आकर्षक (लक्षवेधी) साडी परिधान करणाऱ्या पहिल्या तीन महिलांना 'साडी' देऊन विशेष सन्मानित करण्यात येणार आहे. कोणत्याही वयोगटातील महिला या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी आतापर्यंत २०० हून अधिक महिलांनी आपली नोंदणी केली आहे. या उपक्रमाचे प्रवेश शुल्क १०० रुपये असून अधिक माहितीसाठी ८२०८७१२६९२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
स्थानिक कापड व्यावसायिक 'मांगल्य', 'कामाक्षी क्लॉथ स्टोअर्स', 'वामन शंकर पाटणकर' आणि इतर सहकाऱ्यांच्या पुढाकाराने हा स्त्री-शक्तीचा सोहळा रंगणार आहे.











