
कुडाळ : प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवादाचा अभाव दूर होऊन सामान्यांची कामे गतीने व्हावीत, या उद्देशाने नेरूर (ता. कुडाळ) येथे 'समाधान शिबीर' उत्साहात संपन्न झाले. "संवादाच्या अभावामुळे कोणत्याही नागरिकाचे काम अडू नये, प्रशासनाशी थेट संवाद साधा आणि शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्या," असे आवाहन सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल धोंडमिसे यांनी यावेळी केले.
नेरूर ग्रामपंचायत हॉल येथे शनिवारी वालावल मंडळाचे हे 'समाधान शिबीर' पार पडले. या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
प्रशासन आणि जनता यांतील दुवा : प्रांताधिकारी काळुसे
प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, "हे अभियान सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील दुवा आहे. एका दिवसाच्या शिबिराने सर्व प्रश्न सुटणार नाहीत याची आम्हाला जाणीव आहे, मात्र हा एक स्तुत्य प्रयत्न असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा."
१५ प्रमुख सुविधांचा लाभ एकाच छताखाली
तहसीलदार सचिन पाटील यांनी प्रास्ताविकात या शिबिराचा मूळ उद्देश स्पष्ट केला. शासनाच्या १५ महत्त्वाच्या सुविधा थेट जनतेपर्यंत पोहोचवणे, जनजागृती करणे आणि लोकांचा प्रशासकीय कामांसाठी होणारा फेरा कमी करणे हे या अभियानाचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
शिबिरात झालेली प्रमुख कामे:
भूमी अभिलेख: प्रलंबित फेरफार, ७/१२ दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ वाटप.
दाखले वाटप: उत्पन्न, रहिवासी, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दाखले.
जमीन सुधारणा: वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये करण्याची प्रक्रिया, अकृषिक (NA) परवानगी व मार्गदर्शन.
सामाजिक योजना: संजय गांधी निराधार योजनेचे लाभ, पीएम किसान नोंदणी आणि 'अॅग्रीस्टॅक' शेतकरी नोंदणी.
इतर: तुकडेबंदी प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप व ई-मोजणी अर्ज.
यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार गवस व शिंदे, जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, दीप्ती नाईक, अर्चना बंगे, प्रसाद पोईपकर, राजा प्रभू, चारू देसाई, नेरूरच्या सरपंच भक्ती घाडी, उपसरपंच दत्ता म्हाडदळकर, कवठी सरपंच सौ. करलकर, शेखर गावडे, अतुल बंगे, भूमी अभिलेख अधिकारी गणशकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रुपेश पावसकर यांनी 'येणे' (NA) परवानगीची प्रक्रिया अधिक सुटसुटीत करण्याची मागणी केली. कुडाळ तालुक्यातील वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये करण्याची ही मोठी संधी असून, १० वी - १२ वीच्या विद्यार्थ्यांना या अभियानामुळे प्रवेशासाठी लागणारे दाखले वेळेत मिळणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष बांदेकर यांनी केले.










