वेताळ बांबर्डेतील राम मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन..!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 19, 2024 09:19 AM
views 156  views

कुडाळ : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे महामार्गालगत देऊळवाडी येथील १०५ वर्षे जुन्या मंदिरातही अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याबद्दल कार्यक्रम आयोजित केले आहेत. 

वेताळ बांबर्डे देऊळवाडी येथील या श्रीराम मंदिराचे वैशिष्ट्य असे की, या मंदिरात केवळ प्रभू श्रीराम, देवी सीता आणि हनुमान यांची मूर्ती आहे.  मुख्य म्हणजे या मंदिरात प्रभू श्रीराम आणि देवी सीता यांच्याबरोबर भगवान लक्ष्मण यांची मूर्ती नाही. त्यामुळे प्रभू श्रीराम यांच्याबरोबर बंधू लक्ष्मण यांची मूर्ती नसलेले भारतातील हे पहिलेच मंदिर आहे असा दावा या मंदिराचे प्रमुख विठ्ठल सामंत यांनी केला आहे. तसेच या मंदिराचे प्रमुख सामंत कुटुंबीय आणि मंदिराचे तुळशी वृंदावन एकच असून याची दररोज विधिवत पूजा केली जाते.

२२ जानेवारी रोजी या मंदिरात सकाळी १०.०० ते रात्रौ १०.०० या वेळेत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या मध्ये सकाळी १०.०० वाजता एकादशनी व महाआरती, सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजे पर्यंत श्री राम सामूहिक जप, सायंकाळी ६.०० वाजता वारकरी हरिपाठ, तर रात्री ८.३० वाजता भाऊ सामंत बुवा यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आला आहे तरी जिल्हा वासियानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री राम मंदिर प्रमुख विठ्ठल सामंत यांनी केले आहे.