
दोडामार्ग : प्रजासत्ताक दिना निमित्त विविध ठिकाणी अनेक उपोषणे करण्यात आली. सदाशिव महादेव सावंत यांनी जमिनीची नुकसान भरपाई व जमीन आपल्या ताब्यात द्यावी यासाठी तर न्हानू दत्ताराम जाधव यांनी झरेबांबर हरिजनवाडी रमाईनगर येथे स्मशानभूमी संरक्षक भिंत बांधण्याच्या कामात दिरंगाई होत असल्याच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर उपोषण छेडले होते. तर बाबुराव विठ्ठल पोकळे यांनी सिंचन विहीर साहित्याची रक्कम न मिळाल्याने उपोषण छेडले होते. आश्वासनाअंती तिघांनीही रविवारी उपोषण मागे घेतले.
दोडामार्ग तालुक्यात प्रजासत्ताक दिनी अनेक उपोषणे छेडण्यात आली. यातील काही उपोषण सकाळीच स्थगित करण्यात आली. काही त्यासाठी आश्वासनाअंती मागे घेण्यात आली. तर काही उपोषणे दुसऱ्या दिवशीही सुरू होती. आवाडे येथील जमिनीवर गेल्या २४ वर्षापासून केस चालू असल्याने जे नुकसान झाले आहे, त्याची नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी आयनोडे पुनर्वसन येथील सदाशिव सावंत यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण छेडले होते. तर याच गावचे रहिवासी बाबुराव पोकळे यांनी कसई दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील स्वतःच्या जमिनीत बांधलेल्या सिंचन विहीर साहित्याची रक्कम अद्याप पर्यंत मिळाल्याने उपोषण छेडले होते. नगरसेवक संतोष नानचे यांनी दोन्ही उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घडवून देतो, असे आश्वासन दिल्याने दोघांनीही उपोषण मागे घेतले.
झरेबांबर येथील न्हानू दत्ताराम जाधव यांनी झरेबांबर हरिजनवाडी रमाई नगर स्मशानभूमी संरक्षक भिंत बांधण्याच्या कामात दिरंगाई होत असल्याच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर उपोषण छेडले होते. तहसीलदार अमोल पोवार, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी व झरेबांबर सरपंच अनिल शेटकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. लेखी आश्वासनाअंती हे उपोषण मागे घेण्यात आले.