नवनिर्माण कला संस्थेतर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा

Edited by: मनोज पवार
Published on: August 24, 2025 13:22 PM
views 83  views

खेड : गणेशोत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर नवनिर्माण कला संस्था खेड तालुक्यातील कला व संस्कृतीप्रेमींसाठी आकर्षक स्पर्धांची मेजवानी घेऊन आली आहे. संस्था चित्रकला, मूर्तिकला, कराओके गीतगायन आणि एकपात्री अभिनय अशा चार वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करत असून, स्पर्धकांना आपली कला सादर करण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.

श्री गणेश चित्रकला स्पर्धा शालेय व खुला गट अशा दोन गटांत आयोजित करण्यात आली असून प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते घोषित केले जातील. तसेच श्री गणेश मूर्तिकला स्पर्धा मूर्तिकारांसाठी खुली असून यातही विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देण्यात येईल.

गायन रसिकांसाठी कराओके गीत गायन स्पर्धा ठेवण्यात आली आहे. याशिवाय, एकपात्री अभिनय रिल व्हिडिओ स्पर्धा ‘गणेशोत्सव व समाजप्रबोधन’ या विषयावर आयोजित करण्यात आली असून ती रत्नागिरी जिल्हा मर्यादित असेल.

प्रत्येक स्पर्धेत विजेता, उपविजेता व तृतीय क्रमांकाला आकर्षक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्व स्पर्धांसाठी ऑनलाइन नोंदणीची सोय असून, २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत नावनोंदणी करता येईल. एकपात्री अभिनयासाठी नोंदणी ३१ ऑगस्टपर्यंत राहील.

या उपक्रमामुळे स्थानिक कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी आणि ओळख निर्माण करण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. स्पर्धांविषयी सविस्तर माहितीसाठी ९०११००४७८३, ९४२३०४९४४०, ७५०७७०५४५४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्था अध्यक्ष अनुज जोशी यांनी केले आहे.