
कुडाळ : बांबुळी ग्रामपंचायतीने 13 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 'हर घर तिरंगा' आणि ध्वजवंदन कार्यक्रमाची सुरुवात शासनाच्या 'हर घर तिरंगा' अभियानापासून झाली. 13 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीच्या आवारात ज्येष्ठ महिला श्रीमती माधवी अशोक परब यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 14 ऑगस्ट रोजी श्री. बच्चूजी मेस्त्री यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
78 वर्षांचा प्रवास आणि 79 व्या वर्षात पदार्पण 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा 78 वर्षांचा प्रवास पूर्ण होऊन 79 व्या वर्षात पदार्पण होत असताना, ग्रामपंचायतीने अनेक उपक्रम राबवले. सर्वप्रथम, जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा बांबुळी येथे विद्यार्थ्यांच्या वेशभूषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच श्री. प्रशांत परब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा गौरव
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. लहान गट आणि मोठा गट अशा दोन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेचे परीक्षण श्री. नारायण चेंदवणकर यांनी केले. यामध्ये, लहान गटात प्रथम क्रमांक कु. तनिष्का गोसावी, द्वितीय कु. स्वरा रावराणे, आणि तृतीय क्रमांक कु. शानवी कोचरेकर यांनी पटकावला. मोठ्या गटात प्रथम क्रमांक कु. दिव्या घाडी, द्वितीय कु. कार्तिक मेस्त्री, आणि तृतीय क्रमांक कु. आराध्या बांबुळकर यांना मिळाला. विजेत्या विद्यार्थ्यांना सरपंच आणि उपसरपंच यांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार
ग्रामपंचायतीने 2025 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यामध्ये प्रथम आलेली कु. समिधा संजय कोचरेकर हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, कु. साक्षी कोचरेकर, कु. भक्ती मेस्त्री, कु. आकाश परब, कु. यशश्री परब, कु. गितेश परब, कु. आर्यन बांबुळकर, कु. रोहन सावंत, कु. मयुरेश सावंत, आणि कु. मनीष परब यांचाही सत्कार करण्यात आला. 2024 मध्ये बारावी उत्तीर्ण झालेल्या, विशेषतः कुडाळ तालुक्यात सायन्समध्ये प्रथम आलेल्या कु. शांभवी महेंद्र परब यांचाही सन्मान करण्यात आला. यासोबतच, कु. अश्विनी सावंत, कु. स्वरूप परब, कु. राहुल सावंत, आणि कु. लक्ष्मी सर्वेकर यांचाही गौरव करण्यात आला.
'स्वच्छ भारत, स्वच्छ घर' आणि इतर उपक्रम
यावर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त 'स्वच्छ भारत, स्वच्छ घर' या उपक्रमांतर्गत 15 व्या वित्त आयोगातून प्रत्येक घरोघरी 'स्वच्छता किट' (लायझॉल, भांडी लिक्विड, हार्पिक) वाटप करण्यात आले. तसेच, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जयंतीनिमित्त गावात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अमृत सरोवर येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ विशेष कार्यक्रम घेण्यात आला.
या तीन दिवसीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सुभाष बांबुळकर यांनी केले. सरपंच श्री. प्रशांत परब यांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता झाल्याचे जाहीर करण्यात आले.