
मालवण : हर्षद वराडकर या वराड देऊळवाडी ( वय - २५ ) व्यवसायाने वेल्डर असणाऱ्या मुलाला ८ दिवसांपुर्वी 50,000/- रूपये खात्यात जमा झाल्याचा संदेश आला. सध्या ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार होत असल्याने सुरुवातीला हर्षदने दुर्लक्ष केला. कारण कधी कधी मेसेज येतात परंतु रक्कम जमा झालेली नसते.
काही वेळाने त्याला नेट ओपन केल्यावर एक वॉट्सऍप कॉल आला. आणि चुकुन रक्कम पाठवली गेल्याचे सांगितले गेले. एवढी रक्कम पाठवताना अगोदर एक रूपया पाठवला जातो. त्यामुळे यावरही विश्वास बसेना. बऱ्याच वेळा येथे ही फसवणूक होते. रक्कम चेक केली असता खात्यातील रक्कम वाढल्याचे लक्षात आले.
समोरील रक्कम पाठवणारा पण वेगवेगळ्या फोन वरून फोन करत होता. त्यामुळे रक्कम पाठवणारा कोण? खाते कोणी दुसराच ऑपरेट करतो आहे का? कोणी फसवणारे आहेत का? अशा अनेक शंका उपस्थित होत होत्या. अशा वेळी गावातील पोलिस मित्रांचा सल्ला घेतला. आज काल चुकुन मोबाईलला आलेले रिचार्जचे पैसेपण कोणी मागे करत नाही. येथे तर 50,000/रू रक्कम परत करायचे होते. परंतु आपली फसवणूक तर होणार नाही याची भीती वाटतं होती.
अखेर आठ दिवसांनी समोरील व्यक्तीने आपले पासबुक झेरॉक्स व इतर डीटेल्स पाठविल्यानंतर व रक्कम घेण्यासाठी येण्याची तयारी दर्शविल्यावर व्यक्ती तिच असल्याची खात्री पटली. या संपूर्ण प्रकरणात हर्षद त्या व्यक्तीला गुंगारा देऊ शकला असता. परंतु मालवणी माणुस प्रामाणिक असतो. ही एवढी रक्कम इतर कुठे गेली असती तर कदाचित मिळाली नसती. हर्षदने ती रक्कम सदर व्यक्तीला परत केली. त्या व्यक्तीने स्वतः हुन दोन हजार रुपये देऊ केले. तेही त्याने नाकारले. शेवटी त्यांने 1000 रुपये स्वतः हुन पाठविले. पुणे येथुन चुकुन रक्कम पाठविणारा हा इंजिनिअरींगचे शिक्षण घेणारा विद्यार्थी असुन तो लातूरचा होता. हर्षद वराडकरच्या प्रामाणिकपणाचं कौतुक होत असून त्याचा आदर्श युवा पिढीने घ्यावा अशीच हर्षदची कृती आहे.