
सावंतवाडी : लहान वयातच सर्व ज्ञान प्राप्त करून आपली ज्ञानाची उंची त्याने वाढविली. अनेक कला त्याने आत्मसात केल्या. त्याने आतापर्यंत विविध स्पर्धांत भाग घेऊन ४५० बक्षिसे मिळविली आहेत. असे सर्व ज्ञात असलेला डेगवे-बांदा येथील सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या सर्वज्ञाने अनेक स्पर्धांत आपला ठसा उमटविला आहे. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ असलेल्या सर्वज्ञने महाराष्ट्र, गोवा राज्यात अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. अष्टपैलू संस्कृती कला अकादमी संस्थेने आयोजित केलेल्या अनेक स्पर्धांत प्रथम क्रमांक घेऊन आपली चमक सर्वज्ञने दाखविली आहे. एकच स्पर्धा नव्हे तर वक्तृत्व, वेशभूषा, एकपात्री, गीतगायन, संविधान पठण, नाट्यछटा, एकांकिका, पोवाडा गायन, कथाकथन, रिल बनविणे, हस्ताक्षर, प्रतिज्ञा लेखन, काव्यगायन या स्पर्धांमध्ये सर्वज्ञ प्रवीण असून मंगलाष्टके म्हणण्यातही त्याचा पुढाकार असतो.
अष्टपैलू संस्कृती कला अकादमी स्पर्धेत सर्वज्ञला आळंदी येथे दोन पुरस्कार मिळाले. सफरसह्याद्री ३५० गडकोट मोहीम संस्थेतर्फे आयोजित केलेल्या तब्बल चार स्पर्धांत त्याला २ सुवर्ण, २ रौप्यपदके मिळाली असून त्याचा मुंबई येथे सत्कार करण्यात आला होता. शिवसंस्कार संस्थेतर्फे आयोजित केलेल्या आंतरराज्यीय स्पर्धेत अनेक वेळा सर्वज्ञने पारितोषिके पटकावली आहेत. सवेश नाट्यगीत, अभंग स्पर्धात त्याने अनेक बक्षिसे मिळविली आहेत. संगीतातील गुरुवर्य सौ. वीणा हेमंत दळवी, डेगवेतील प्रसिद्ध बुवा तात्या उर्फ दत्तप्रसाद स्वार, शाळेतील शिक्षक तसेच वडील सूर्यकांत वराडकर यांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या कथा त्याला प्रेरित करतात, असे तो सांगतो. लहान वयातच एवढी भरारी घेतलेला सर्वज्ञ अनेकांच्या कौतुकास पात्र ठरलेला आहे.